|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटचा डाव हाणून पाडा

‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटचा डाव हाणून पाडा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

गोकुळ दूध संघ हातातून जाण्याच्या भितीपोटीच सत्ताधाऱयांकडून संघ मल्टिस्टेट करण्याच्या हालचाली सुरु आहेत. संघ मल्टिस्टेट झाल्यास मुळ सभासदांचे अस्तित्व धोक्यात येणार असून ‘ठराविक’ लोकांची मक्तेदारी निर्माण होणार आहे. दूध उत्पादकांना सध्या ज्या सोई सुविधा मिळतात, त्या सुविधा  मिळणार नाहीत. शासकीय ऑडिट रिपोर्टनुसार परराज्यातील दूध स्विकारून संघ तोटय़ात आला आहे. तरीही संघ मल्टिस्टेट करण्याचा ‘व्यापाऱयाचा कुटील डाव’ हाणून पाडा असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. या विरोधात कोल्हापूर जिह्यातील दुध उत्पादक शेतकऱयांसह राजकीय प्रतिनिधींनी एकत्र यावे असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले.

21 सप्टेबर रोजी गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत ‘मल्टिस्टेट’ च्या ठरावाला विरोध करण्यासाठी गोकुळ बचाव कृती समितीच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील, विजयसिंह मोरे, बाळासाहेब कुपेकर, किशोर पाटील, महेश नरसिंगराव पाटील, सदाशिव चरापले, बाबासाहेब देवकर, सुधीर देसाई, मधुआप्पा देसाई, बजरंग पाटील, किरण पाटील, बाबासाहेब चौगले, श्रीपती पाटील, भिमगोंड बोरगावे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 आमदार पाटील म्हणाले, सर्वसामान्य दूध उत्पादकांची आर्थिक प्रगती व्हावी, त्यांना योग्य दर मिळावा या हेतूने कै.आनंदराव पाटील-चुयेकर यांनी गोकुळ दुध संघाची उभारणी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दुध संघाची मोठी प्रगती साधली गेली. म्हणूनच आज राज्यभर गोकुळ दुध संघाची एक वेगळी ओळख आहे. मात्र स्वत:च्या फायद्यासाठी हा संघ मल्टीस्टेट करून दुध उत्पादकाच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. कार्यक्षेत्राबाहेरचे दूध आणल्यामुळे गोकुळ दुध संघाला कोटय़वधींचा तोटा झाल्याचे ऑडिट रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे. 2015-16 मध्ये कार्य क्षेत्राबाहेरील दूध संकलन केल्यामुळे संघाला 24 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.. तर 2017-18 मध्ये संघाला 64 कोटींचा तोटा झाला आहे. ही वस्तूस्थिती असताना जिह्याचे कार्यक्षेत्र सोडून, दुध संघ मल्टीस्टेट करण्याचा निर्णय कोणत्या हेतून घेतला जात आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मल्टिस्टेटमुळे कोल्हापूर जिह्याचे कार्यक्षेत्र सोडून, इतर लोकांना फायदा होणार असेल तर जिह्यातील दुध उत्पादक शेतकरी गप्प बसणार नाहीत, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला. गोकुळच्या कारभाऱयांना मागील निवडणूक जड गेली होती. गत निवडणुकीत अगदी कमी मतांनी विजयी झालेले विद्यमान संचालक त्यांचा भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार उघडकीस येण्याच्या भीतीनेचं ते हबकून गेले आहेत. त्यांच्या हातातून गोकुळ संघ जाणार असल्याची भीती त्यांना असल्यानेच, गोकुळ मल्टीस्टेट करण्याचा घाट सत्ताधारी कारभारी मंडळीनी घातला आहे, अशी घणाघाती टिका आमदार पाटील यांनी केली. बाहेरील राज्यातील संस्थांना सभासद केले तर जिह्यातील संस्थांवर व सभासदांवर निवडणुकीत अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. मूळ सभासदांना संचालक मंडळ दाद देणार नसून परराज्यातील लोकांची संचालक मंडळावर नियुक्ती करावी लागणार आहे. त्यामुळे गोकुळ संघाला वैभव प्राप्त करून देणाऱया जिह्यातील संस्थांचे महत्व संपुष्टात येणार आहे. संघ मल्टिस्टेट झाल्यानंतर राज्यसरकारचा कोणताही संबंध राहणार नाही. हा संघ केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आला तर संपूर्ण देशासाठी एकच निबंधक असतो. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचा हस्तक्षेप राहणार नसून संचालकांना मनमानी करता येणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.  

    माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, आपली मक्तेदारी कायमची रहावी यासाठीच कारभारी मंडळी गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीमध्ये एक प्रकारे त्यांची हुकूमशाही सुरु असून मल्टिस्टेटचा निर्णय सदस्यांच्या हितावर घाला घालणारा आहे. त्यामुळे याविरोधात सदस्यांनी एकत्र यावे असे आवाहन पवार-पाटील यांनी केले.

दरम्यान, बाबासाहेब कुपेकर यांनी, दौलत सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट केल्यानंतर काय झाले, हे आम्ही जवळून पाहिले आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या हितासाठी गोकुळ बचाव मंचसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कागल येथील सुधीर देसाई म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ यांचा प्रतिनिधी म्हणून बैठकीला उपस्थित आहे. मल्टिस्टेट विरोधासाठी सतेज पाटील यांना आमदार हसन मुश्रीफ यांनी पाठींबा दर्शविला असून 21 सप्टेबरला होणाऱया सभेसाठी आमदार मुश्रीफ  उपस्थित राहणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

   मल्टिस्टेट विरोधातील ठराव 18 सप्टेबरपर्यंत जमा करण्याचे आवाहन

 गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करू नये याबाबत प्राथमिक दूध संस्थांनी ठराव करावा. हे ठराव सहाय्यक निबंधक दूग्ध किंवा विभागीय उपनिबंधक, दूग्ध (पुणे) यांच्याकडे पाठवून द्यावा. किंवा ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालयामध्ये 18 सप्टेबरपर्यंत ठराव जमा करावेत असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

              सर्वसाधारण सभेच्या ठिकाणात बदल करावा

   मार्केट यार्ड येथील राजर्षी शाहू सांस्कृतिक भवनात गोकुळच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. या सभागृहात 1800 खुर्च्या आहेत. तर 12 हजार स्क्sवअर फुटाचा मंडप घातला  आहे. एवढय़ा कमी जागेत सभेचे आयोजन करून विरोधकांना बसण्यासाठी जागाच उपलब्ध करून न देण्याचा सत्ताधाऱयांचा विचार आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी तसेच विरोधाकांना आपले प्रश्न मांडता यावेत, यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी सर्वसाधारण सभेच्या ठिकाणात बदल करावा असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.

             तालुकानिहाय दौरा करून जनजागृती करा

    येत्या तीन दिवसात तालुकानिहाय दौरे करून मल्टिस्टेटविरोधात जनजागृती करण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले. तसेच 21 सप्टेबर रोजी होणाऱया सभेसाठी सकाळी 9 वाजता एकत्र येण्याची विनंती आमदार पाटील यांनी उपस्थित  प्राथमिक दूध उत्पादकांना केली.