|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत लाच घेताना वाहतूक पोलिसाला अटक

मिरजेत लाच घेताना वाहतूक पोलिसाला अटक 

प्रतिनिधी/ मिरज

लाकुड वाहतुकीचा टेम्पो सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱया मिरज वाहतूक पोलीस शाखेतील पोलिस नाईक महेश पोपट कांबळे याला लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.

तक्रारदार याचा लाकुड वाहतुकीचा टेम्पो रविवारी मिरज वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस नाईक महेश कांबळे याने अडविला होता. टेंपावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी टेंपो चालकाकडून दोन हजार रुपये लाच स्वीकारुन उरलेले तीन हजार रुपये घेऊन टेंपो मालकाला पाठवून दे, असे कांबळे यांनी चालकाला सांगितले होते. तक्रारदार टेंपो मालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदारांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांनी मंगळवारी मिरज एसटी स्टँडजवळ जैन मंदिरासमोर एका हॉटेलमध्ये सापळा रचला. त्यावेळी तक्रारदार टेम्पो मालक उरलेले तीन हजार रुपये घेऊन महेश कांबळे यांच्याकडे गेला. त्यावेळी त्याने ही रक्कम नंदकुमार संजय सर्वदे या इसमास देण्यास सांगितले. टेम्पो मालकाने ही रक्कम नंदकुमार सर्वदे यास दिली. त्याचवेळी पथकाने सर्वदे यास रंगेहाथ पकडले. सदर दोघांवर महात्मा गांधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कारवाई पोलीस उपायुक्त संदीप दिवाण, अप्पर पोलीस उपायुक्त राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिक्षक राजेंद्र तेंडूलकर, पोलिस कर्मचारी अविनाश सागर, जितेंद्र काळे, बाळासाहेब पवार, संग्राम पाटील, मयूर देसाई यांनी केली.