|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत चेन स्नॅचरला अटक

मिरजेत चेन स्नॅचरला अटक 

प्रतिनिधी/ मिरज

गेल्या वर्षभरात मिरज शहरातील विविध भागात चेन स्नॅचिंग करणाऱया राहुल मोहन जाधव (वय 25, रा. बसाप्पाचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) या तरुणास शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून शहरातील चार गुह्यांचा छडा लागला असून, दोन लाख, दहा हजार रुपयांचे सोने व 50 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा दोन लाख, 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचा अन्य साथीदार सदवीर याचा शोध पोलिस घेत आहेत.

गेल्या वर्षभरात शहरातील ब्राह्मणपुरी, दिंडीवेस, होळीकट्टा, आंबेडकर बाग या भागात चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. रस्त्याने जाणाऱया एकटय़ा महिलांना हेरुन सकाळी आणि दुपारच्यावेळी मोटारसायकलवरुन येणारे दोघे तरुण महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेत. याबाबत शहर पोलीस ठाणे आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांनी याबाबत पाळत ठेवली होती. पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, उपाधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी राहूल मोहन जाधव याला संशयित म्हणून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, तो आणि त्याचा साथीदार सदवीर याने शहरात वेगवेगळ्या चार ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली.

आरोपी हा दिल्ली येथे सोन्याच्या आटणीच्या दुकानात यापूर्वी काम करीत होता. त्यामुळे त्याला सोने गाळणाऱया दुकानदारांशी परिचय होता. यातूनच त्याने सदरवीर याला साथीला घेऊन चेन स्नॅचिंग करण्यास सुरूवात केली. त्याने ब्राम्हणपूरी भागात दोन, दिंडीवेसमध्ये एक तर होळी कट्टय़ावर एक अशा चार ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे. याठिकाणी चेन स्नॅचिंग करीत असताना मोटार सायकलची नंबर प्लेट दिसू नये, यासाठी त्यावर चिखल फासत असत. स्नॅचिंग केलेले सोने हे ढालगांव येथे एका सोनाराकडे विकले होते.

पोलिसांनी त्याने दिलेल्या माहितीनुसार सदरचे सुमारे 70 ग्रॅम वजनाचे सोने आणि चेन स्नॅचिंग करणाऱयासाठी वापरलेली मोटारसायकल असा दोन लाख, 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, कॉन्स्टेबल लक्ष्मण जाधव, मुक्तार चमनशेख, विष्णू काळे, सचिन धोत्रे, संतोष पुजारी, अभिजित पाटील, नागेश मासाळ, माणिक शिंदे, सुहेल मुल्ला, उमेश कोळेकर यांनी सहभाग घेतला. सदर आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.