|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया 

प्रतिनिधी / डिचोली

पावसाळय़ात बहरणाऱया निसर्ग सौंदर्याची खरी उपासना-पूजा म्हणजेच पर्यावरणपूरक गणेश चतुर्थीची संकल्पना आहे. ही गणेश चतुर्थी ‘इको प्रेंडली’ पद्धतीने साजरी करण्यासाठी आपण सर्वांनी सर्व प्रथम आपल्या घरात विराजमान होणाऱया गणेश मूर्तीपासून सुरुवात करायला हवी, यासाठी प्लास्टर ऑफ पॅरीस च्या गणेश मूर्तीला नाकारावे लागेल, असा संदेश डिचोलीचे नगराध्यक्ष राजाराम उर्फ सतीश गावकर यांनी दिला आहे.

आमच्या पूर्वकालीन गणेशोत्सवातील गणेश चतुर्थी आठवल्यास लक्षात येते की त्यावेळी इतका झगमगाट नव्हता. कुठे प्लास्टिकचा वापर नव्हता. थर्माकोलचा वापर तर क्वचितच दिसायचा. प्लास्टर ऑप पॅरीसच्या मूर्तीविषयी त्याकाळी कोणाला साधी कल्पनाही नव्हती. आज मात्र काळ फार बदलला आहे. आज पर्यावरण व निसर्गाबरोबर मानवी जीवनालाही वाईट परिणाम करू लागले आहे. त्यासाठी आज पुन्हा सर्वांनी पर्यावरणपूर्वक गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करणे गरजेचे आहे.

डिचोली नगरपालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत सदैव एक पाऊल पुढे ठेवलेले आहे.  शहरात प्लास्टिकचा कचरा आटोक्यात आणताच इतर वस्तूंचा कचराही वेळोवेळी हटविण्याची मोहीम कायम ठेवली आहे. या पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पावर या कचऱयाची विल्हेवाट लावली जात असताना ‘सोलीड वेस्ट मेनेजमेंट’च्या निर्देशानुसार प्लास्टिक कचरा अधिक प्रमाणात जमिनीवर राहू नये यासाठी आमचे सदैव प्रयत्न असतात, असे नगराध्यक्ष गावकर म्हणाले.

काही दिवसांपूर्वी झालेल्या पालिका मंडळाच्या डिचोली बाजारात व इतर ठिकाणी 50 मायक्रोन पेक्षा कमी दर्जाचे प्लास्टिक विकणाऱयाविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा ठरावा घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरु करण्यास आली असून नोटीस जारी करण्याचे काम हाती घेतलेले आहे. बहुतेक येत्या 2 ऑक्टोबरपासून डिचोली प्लास्टिक बंदीचा कडक कायदा लागू करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, असे गावकर यांनी सांगितले.

इको प्रेंडली गणेश चतुर्थी साजरी करायची झाल्यास सर्व प्रथम आपण आपल्या गणेशमूर्ती पारंपरिक चिकण मातीच्या खरेदी करून त्या पुजेला लावाव्यात. त्यामुळे आपल्या मनाला किती दैवी समाधान लाभण्याचा अनुभव घ्या. त्याचबरोबर गणेश विसर्जनवेळी पिशवीत ठेवलेले निर्माल्य पाण्यात सोडताना पिशवी उघडून सोडावे. तसेच सदर पिशवी पाण्यात न टाकात जवळच असलेल्या कचरा कुंडीत टाकावी, असा सल्ला सतीश गावकर यांनी दिला.