|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चतुर्थीसाठी कुडचडे बाजारपेठ सजली

चतुर्थीसाठी कुडचडे बाजारपेठ सजली 

प्रतिनिधी/ कुडचडे

गणेश चतुर्थीसाठी कुडचडेची बाजारपेठ पूर्णपणे सजलेली असून बाजारात माटोळीच्या साहित्याच्या विक्रीसाठी विक्रेत्यांनी गर्दी केली आहे. गणेश चतुर्थीचा सण अगदी दोन दिवसांवर आला आहे. माटोळीचे सामान हे महत्त्वाचे असून त्यातील काही वस्तू अखेरच्या दिवशी मिळत नसल्याने नागरिक आधीच त्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यंदाही अशा प्रकारची परिस्थिती कुडचडे बाजारात पहायला मिळत आहे.

कुडचडे बाजारात दाभाळ, कुळे, काले, सांगे, साळजिणी, मळकर्णे, पंचवाडी, अमणाळ, शिरोडा, चांदर, मडगाव तसेच विविध ठिकाणांहून विक्रेते व ग्राहक येताना दिसत आहेत. बाजारात माटोळीचे सामान व अन्य सामग्री स्वस्त असल्यामुळे ग्राहकांनी गर्दी केली आहे. यात नारळाची पेंड, सुपारीची शिंप्टी, फुल असलेले केळय़ांचे घड, केळीची व हळदीची पाने, आळू, आंबाडे, नीरफणस, कांगलां, कात्रे, लिंबू, कारली, चिवरां, कोकम, कुमडळां, कद्धय़ाफळ, ताबलेफळ, भिल्लफळ, माट्टीकात्रे, पत्रेफळ, कुडय़ाकात्रे, उमळीफळ, आटकेफळ, मावळिंग, चिकू, पेरू, निमलेफळ, चायलीफळ, अननस, तोरिंग, दिमकीफळ आदींचा समावेश आहे.

बाजारात आलेले हे विक्रेते रात्री किती वाजता घरी पोहोचणार याची खात्री नसून चतुर्थीला अजून दोन दिवस बाकी आहेत. सदर सामग्री घेऊन ये-जा करणे सोपे नसल्याने अनेक विप्रेते माल बाजारातच ठेऊन रात्रपाळी करत आहेत. वनात मिळणारी सदर फळे व अन्य नग शहरी लोकांपर्यंत पोहोचविणे हे सोपे काम नाही. त्यातच सध्या प्रगतीच्या नावाखाली डोंगर कापले जात असून माटोळीला बांधण्यात येणारी काही प्रकारची औषधी गुणांची फळे आता मिळत नसल्याने ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत, अशी माहिती काही विक्रेत्यांनी दिली. खाण व्यवसाय बंद पडल्यामुळे सध्या खाण अवलंबितांवर कठीण प्रसंग आलेला आहे. त्याची जाणीव ठेवत माटोळीच्या वस्तूंचे भावही विक्रेत्यांनी मर्यादित ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.