|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » डिचोलीत गणेश चतुर्थीच्या तयारीला वेग

डिचोलीत गणेश चतुर्थीच्या तयारीला वेग 

प्रतिनिधी/ डिचोली

गोमंतकीय जनतेचा सर्वांत प्रिय सण म्हणून गणल्या जाणाऱया गणेश चतुर्थी उत्सवाच्या तयारीला सर्वच पातळीवरून वेग आलेला आहे. बाजारपेठांमधील सर्वच दुकाने गणेश चतुर्थीला लागणाऱया विविध प्रकारच्या सामानाने सजली आहेत. खरेदीसाठी बाजारात गर्दीही वाढू लागली आहे. गर्दी होत असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. डिचोली तालुक्यातील 9 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच पोलीस स्टेशनच्या गणेश उत्सवाची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे.

हिंदू धर्मियांबरोबरच इतरही धर्मांमध्ये प्रिय असलेला गणेशाच्या उत्सवासाठी संपूर्ण गोमंतकात उत्साही वातावरण असते. लहान मुलांमध्ये तर गणेशाच्या आगमनाची आतुरता दिसून येत आहे. मंगळवारी शाळा सुटल्यानंतर मुलांनी चतुर्थीच्या सुट्टीचा आनंद लुटायला सुरूवात केली आहे.

बाजारात माटोळी व इतर सामान दाखल

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बाजारात मोठय़ा प्रमाणात माटोळीचे सामान दाखल झाले आहे. निसर्गाच्या उपासनेचा संदेश देणाऱया या गणेश उत्सवात जंगलातील पावसाळय़ात सापडणाऱया विविध फळे, फुले व पानांचा अविष्कार घराघरात माटोळीच्या स्वरूपात दिसून येतो. माटोळीसाठी लागणारे हे विविध प्रकारचे सामाना सध्या बाजारात मोठय़ा प्रमाणात दाखल झाले असून या सामानाने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. आज हेच सामान खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी होणार आहे.

महागाईचे सावट असूनही खरेदीसाठी उत्साह

यावर्षी गणेश चतुर्थीवर महागाईचे संकट आहे. तरीदेखील गणेश भक्तांमध्ये खरेदीसाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. आपल्या प्रिय देवतेच्या सेवेत काहीही कमी पडू नये यासाठी गणेशभक्त धडपडतो आहे. काहीजण तर उधारीवर खरेदी किंवा व्याजावर पैसे घेऊन हा सण साजरा करत असतात. त्यामुळे महागाईचे सावट असूनही बाजारपेठांवर मोठासा परिणाम दिसून येत नाही. चतुर्थीच्या लागणाऱया सामानाच्या सामानासाठी गर्दी वाढतच आहे.

गणेशमूर्ती शाळांतील काम अंतिम टप्प्यात

गणेश चतुर्थीसाठी गेले तीन महिने सातत्याने दिवसरात्र गणेशमूर्ती घडविण्याचे काम करणारे मूर्तीकार सध्या गणेशमूर्ती रंगविण्याच्या कामात मग्न आहेत. जवळजवळ सर्वच मूर्ती रंगवून पूर्ण झाल्या असून नजर रेखणी व नक्षीकाम करण्यात ते आता व्यस्त झाले आहेत. 13 सप्टेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत सर्वच चित्रशाळा रिकाम्या होणार आहेत. काहीजणांनी गेल्या दोन दिवसांपासूनच गणेश चित्रशाळांतून गणेशमूर्ती घरी न्यायला सुरूवात केली आहे.

पाऊस नसल्याने बाजारात फिरणे सोयीस्कर

गेले दोन तीन दिवसा फारसा पाऊस झाला नसल्याने व्यापारी वर्गाची चांगली सोय झाली. याशिवाय बाजारात येणाऱया ग्राहकांना सामान खरेदी करणे व बाजारात फिरणेही सोयीस्कर झाले. आजही पावसाने अशीच कृपा करावी, अशी मनिषा अनेक व्यापाऱयांनी व्यक्त केली आहे, मात्र कडक उन्हामुळे थोडा त्रासही व्यापारी व ग्राहकांना सहन करावा लागला. माटोळीसाठी जंगलातून आणलेले साहित्य कडक उन्हामुळे कोमेजले होते, पण तरीही पाऊस नसल्याने व्यापारी व ग्राहकांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला.

वाहतूक पोलिसांकडून कडक बंदोबस्त

बाजारात गर्दी वाढू लागल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्नही सतावू लागला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डिचोली वाहतूक पोलिसांनी आधीच खबरदारी घेतली आहे. पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून वाहतुकीच्या कोंडीकडे सातत्याने नजर ठेवण्यात येत आहे. बाजारात गैरप्रकार होऊ नयेत याकडेही पोलीस लक्ष ठेऊन आहेत. डिचोली पोलीस साध्या वेशातही बाजारपेठांवर करडी नजर ठेऊन आहेत.