|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कणकवलीत साडेचार लाखाचे दागिने लंपास

कणकवलीत साडेचार लाखाचे दागिने लंपास 

बसस्थानकावरील घटना : दुसऱया घटनेत पर्समधील रक्कम लांबविली

कणकवली

आडवली येथे जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढत असलेल्या अमिता केशव मसुरकर (मूळ आडवली व सध्या रा. कणकवली) यांच्या पर्समधील सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे 15 तोळय़ांचे सोन्याचे दागिने चोरटय़ाने चोरले. ही घटना कणकवली बसस्थानक येथे मंगळवारी दुपारी 1.45 च्या सुमारास घडली. तर याच दिवशी दुपारच्याच सुमारास बसमध्ये चढणाऱया अन्य एका युवतीच्या पर्समधीलही दोन हजार रुपये चोरटय़ाने चोरले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढलेली असतानाच चोऱयांचे प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिता या पतीसमवेत आडवली येथे जाण्यासाठी कणकवली-आचरा-मालवण या बसमध्ये चढत होत्या. हे दागिने एका रुमालात बांधून ते छोटय़ा पर्समध्ये घालून ही छोटी पर्स त्यांनी मोठय़ा पर्समध्ये ठेवली होती. बसमध्ये चढल्यानंतर त्यांना पर्सची चेन उघडलेली दिसली. त्यांनी पाहिले असता, आतील दागिन्यांची छोटी पर्स चोरीस गेल्याचे आढळले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये तीन हार, एक मंगळसूत्र, तीन चेन, आठ आंगठय़ा, एक रिंग, एक कुडीजोड, एक झुंबर आदींचा समावेश आहे.

घडल्या प्रकारानंतर अमिता यांनी नातेवाईकांसह पोलिसांत धाव घेतली. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आपण वाहकाला सांगितले. वाहकाने बसस्थानक येथे तक्रार करण्यास सांगितले. मात्र, आपण तक्रार करण्यास गेले असतानाच बस मार्गस्थ झाली होती. वास्तविक, बस थांबवून प्रवाशांचीही तपासणी करायला हवी होती, अशी नाराजीही मसुरकर कुटुंबियांनी पोलिसांशी बोलताना व्यक्त केली. पुढे मसुरकर यांच्या फिर्यादीनुसार घटनेची पोलिसांत नोंद करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरा सुरू होती.

दरम्यान, मंगळवारी दुपारच्याच सुमारास कणकवली बसस्थानक येथेच बसमध्ये चढत असलेल्या युवतीच्या पर्समधील दोन हजार रुपये चोरटय़ाने चोरले. याबाबत एसटी प्रशासनाने बसस्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असून यात एक युवक फलाटावर संशयास्पद फिरताना दिसत आहे. या युवतीनेही पोलिसांत धाव घेऊन चोरीबाबत तक्रारअर्ज दिला आहे.

बसस्थानकावर वारंवार चोऱया

कणकवली बसस्थानकावर होणाऱया चोऱया ही जणू नित्याचीच बाब बनली आहे. बसमध्ये चढत असणाऱया प्रवाशांच्या गळय़ातील चेन, मंगळसूत्र अथवा पर्समधील पैसे चोरीस जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र, चोरटे पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. पोलीस फक्त चतुर्थीपूर्व बैठकांमध्ये दक्षतेच्या सूचना देतात व ‘अलर्ट’ असल्याचे सांगतात. मात्र, ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक प्रवाशांनी गजबजले आहे. अशा स्थितीत एकाच दिवशी चोरीच्या दोन घटना घडल्याने प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.