|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जनावरांच्या वाहतुकीवरून वादंग

जनावरांच्या वाहतुकीवरून वादंग 

प्रतिनिधी/ सावंतवाडी

गुजरातमधील राजकोट येथून गिर जातीच्या गाई व वासरांची सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथे टेम्पोने वाहतूक केली जात असताना रत्नागिरी येथे ‘वाईल्ड लाईफ सर्व्हायर’च्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरी येथे ती रोखून धरली. तेथे रत्नागिरी ग्रामीण पोलिसात हे प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून या गाई, वासरांची टेम्पोसह वाहतूक करण्यास परवानगी दिली. मात्र गाई, वासरांची हेळसांड होत असल्याचा आरोप करीत वाईल्ड लाईफ सर्व्हायरच्या कार्यकर्त्यांनी सावंतवाडीपर्यंत त्यांचा पाठलाग केला. या प्रवासादरम्यान एका वासराचा मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. दरम्यान, या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

वाईल्ड लाईफ सर्व्हायरच्या कार्यकर्त्यांनी तब्बल नऊ तास रत्नागिरी ते सावंतवाडी असा प्रवास केला. या संदर्भात परस्परविरोधी तक्रार दाखल झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या गिर जातीच्या गाई सांगेली येथे अभिजीत कविटकर यांच्या गो शाळेत पालनासाठी आणल्या जात होत्या. त्याबाबत माहिती अशी की, सांगेली येथील एका गोपालन शाळेत राजकोट येथून गिर जातीच्या गाई टेम्पोत भरून चालक राठोड व त्यांचे सहकारी सावंतवाडीत येत होते. 10 सप्टेंबरला रात्री रत्नागिरी येथे वाईल्ड लाईफ सर्व्हायरच्या संध्या कोसुंबकर, एसटीसीएचे कार्यकर्ते अनिकेत वाडेकर आणि हर्षल कोसुमकर यांनी टेम्पो अडवला. टेम्पोत पुरेशी जागा नसताना 10 गाई व 7 वासरे अशी एकूण 17 जनावरे त्यांना आढळली. त्यांनी चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली. चालकाकडे परवाना नसताना तसेच जनावरांच्या चाऱया-पाण्याची व्यवस्था नसल्याने जनावरांची हेळसांड व छळवणूक होत असल्याचा आरोप करून त्यांनी टेम्पो अडवला.

खात्री करण्यासाठी केला पाठलाग

हे प्रकरण रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. तेथे ग्रामीण पोलिसांनी कागदपत्रांची पाहणी केली. तसेच वाईल्ड लाईफ सर्व्हायरच्या कोसुंबकर यांचा जबाब घेऊन टेम्पो सोडून दिला. मात्र या जनावरांची हेळसांड होत असल्याने आणि ही जनावरे गो शाळेतच नेली जात आहेत का, याची खात्री करण्यासाठी  वाईल्ड लाईफ सर्व्हायरच्या या कार्यकर्त्यांनी या टेम्पोचा पाठलाग केला. पाठलाग करीत ते सावंतवाडीत आले. सावंतवाडी पोलीस ठाण्यात हे प्रकरण गेले. या दरम्यान मनसेचे ऍड. राजू कासकर, श्रीपाद सावंत, मिलिंद देसाई, ऍड. संभाजी सावंत, सुजन पाटणकर, विली गोवेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. टेम्पोतील गाई, वासरांचे प्रथम रक्षण करा, अशी मागणी त्यांनी केली. टेम्पोतून वाहतूक होणाऱया गाईंचे मालक तसेच सिंधुदुर्ग जिल्हा गोपालन संघटनेचे संघटक एकनाथ गावडे यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन दोघांच्या तक्रारी असतील, तर रितसर नोंद करून घेण्यात येईल, असे सांगितले.

एका वासराचा प्रवासात मृत्यू

वाईल्ड लाईफ सर्व्हायरच्या कोसुंबकर यांनी टेम्पो चालक लखन गब्बू राठोड (38, रा. राजकोट) याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली, तर टेम्पो चालक लखन राठोड याने वाईल्ड लाईफ सर्व्हायरच्या संध्या कोसुंबकर, अनिकेत वाडेकर, हर्षल कोसुंबकर, रुपेश यादव यांच्या विरुद्ध तक्रार दिली. ‘या सर्वांनी रत्नागिरीतील निवळी येथे टेम्पो अडवला. त्यामुळे टेम्पोतील गाई व वासरांना चारापाणी देण्याची व्यवस्था होऊ शकली नाही. यात वासराचा मृत्यू झाला. रत्नागिरीपासून आमचा पाठलाग करीत चालकासह तिघांना त्यांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच मोबाईल हिसकावून घेतला’, अशी तक्रार चालक राठोड याने या चौघांविरुद्ध दिली.

रत्नागिरी पोलिसांनी सोडला टेम्पो

दरम्यान गोपालनसाठी या गाई आणल्या जात असताना अशा प्रकारे त्रास दिला जात असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी कागदपत्रे तपासून टेम्पो सोडला असता अशा प्रकारे दादागिरी केली जात असेल,  तर चुकीचे आहे, असा आरोप येथील गोपालकांनी केला. दरम्यान रत्नागिरीत टेम्पो अडविल्यानंतर गोपालनासाठी जिल्हय़ात कार्य करीत असलेल्या प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱयाला ही माहिती मिळाली. त्यांनी या संदर्भात रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधून या गाई गोपालनासाठीच आणल्या जात असल्याचे सांगितल्यामुळे रत्नागिरी पोलिसांनी हा टेम्पो सोडल्याचे सांगण्यात आले.

राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने दबाव!

दरम्यान वाईल्ड लाईफ सर्व्हायरच्या संध्या कोसुंबकर यांनी ‘आम्ही प्राणी मित्रांसाठी काम करतो. आमची राज्यस्तरीय संघटना आहे. एका टेम्पोमधून सात जनावरे आवश्यक असाताना 17 जनावरे कोंबण्यात आली. तसेच जनावरे वाहतुकीच्या परवान्याची मुदत सहा महिन्यांपूर्वीची होती. ती संपली असताना जनावरांची वाहतूक करण्यात आली. टेम्पो चालकाकडे परवाना व चारापाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे एका वासराचा मृत्यू झाला. ही जनावरे गोपालनासाठी आणली जात नव्हती, तर जनावरे वाहतूक करणाऱयाचा खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय आहे. ही जनावरे गोशाळेत आणली जात होती का, हे पाहण्यासाठी आम्ही पाठलाग केला. जनावरांच्या सुरक्षेसाठी आम्ही कार्य करीत असताना आमच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत आम्ही दाद मागणार आहोत. रत्नागिरी पोलिसांनी आमचा जाबजबाब घेतल्यामुळे आमच्याकडे पुरावा आहे.  संबंधित जनावरे आणणारा एका पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे दबाव आणण्यात आला. त्यामुळे जनावरे सोडून देण्यात आली. परंतु, आम्ही या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान या संदर्भात गुन्हा दाखल करून तो रत्नागिरी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे निरीक्षक सुनील धनावडे यांनी सांगितले. दरम्यान एका पक्षाच्या पदाधिकाऱयाने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.