|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्मशानभूमीतील विद्युत वाहिन्या तोडण्याचा प्रकार

स्मशानभूमीतील विद्युत वाहिन्या तोडण्याचा प्रकार 

प्रतिनिधी/ बेळगाव

वडगाव स्मशानभूमीची संरक्षक भिंत पडली असून विविध समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अशातच आता स्मशानभूमीतील विद्युत पुरवठय़ाच्या वाहिन्या तोडण्याचा प्रकार काही समाजकंटकांनी चालविला आहे. यामुळे नाझर कॅम्पसह स्मशानभूमी परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे.  अवैद्य कामासाठी विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

स्मशानभूमीची संरक्षक भिंत कोसळली असल्याने संरक्षण भिंत बांधण्याची मागणी करण्यात आली होती. पण याकडे महापालिका प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. स्मशानभूमीतील शेड खराब झाले असल्याने कोणत्याहीक्षणी कोसळण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे गवत आणि झाडेझुडपे वाढली असल्याने स्मशानभूमीत अस्वच्छता निर्माण झाली आहे. स्मशानभूमी विविध समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे स्मशानभूमीतील समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. याची दखल घेवून उपमहापौर मधुश्री पुजारी यांनी महापालिकेच्या अभियंत्यासमवेत स्मशानभूमीची पाहणी करून समस्यांचे निवारण करण्याचा आदेश दिला होता. पण महापालिकेच्या अभियंत्यानी समस्या सोडविण्यासाठी केवळ खर्चाचे इस्टिमेट तयार केले आहे. याव्यतिरिक्त कोणतेच काम केले नाही. यामुळे स्मशानभूमीत गैरप्रकारांना ऊत आला आहे. जुगार, मटका आणि गांजा विक्री अशा अवैध धंदे करण्यासाठी स्मशानभूमी आणि उद्यानाचा वापर केला जात असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

अवैद्य धंदे करण्यासाठी स्मशानभूमीतील विद्युत दिवे बंद करण्यात येत आहेत. याकरिता काही समाजकंटकांनी स्मशानभूमीतील दिव्याच्या विद्युत वाहिन्या तोडण्याचा प्रकार मागील चार महिन्यापासून चालविला आहे. विद्युत वाहिन्या तोडण्यात आल्याने स्मशानभूमी, नाझर कॅम्पसह परिसरातील पथदिप बंद होत आहेत. यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत. विद्युत वाहिन्या तोडण्यात आल्याने दुरूस्तीचे काम करण्यात येत आहे, पण लागलीच चार दिवसांनी विद्युत वाहिन्या तोडण्यात येत आहेत. यामुळे विद्युत वाहिन्या तोडताना कोणी आढळल्यास महापालिकेला संपर्क साधण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: