|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘मार्कंडेय’चे धुरांडे यंदा पेटणार

‘मार्कंडेय’चे धुरांडे यंदा पेटणार 

वार्ताहर/काकती

येत्या दीड महिन्यात कारखान्याचे उर्वरित काम पूर्ण होणार असून कारखाना चालवण्यासाठी आवश्यक परवान्यांची पूर्तता होताच यंदाच्या गळीत हंगामचे धुरांडे पेटणार आहे, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी व्यक्त केला. मंगळवारी मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

 पोतदार पुढे म्हणाले की, ऊस गाळप हंगामासाठी 60 कोटी भांडवलाची आवश्यकता आहे. यासाठी राज्य अपेक्स बँकेच्या पथकाने कारखानास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली आहे. त्याविषयी त्यांनी समाधानही व्यक्त करून सदर भांडवल मंजूर करण्याचे आश्वासनही दिले आहे. याबाबत सकारात्मक काम सुरू आहे. यावेळी शेतकरी नाना टुमरी यांनी कारखाना कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला. यावर अध्यक्ष म्हणाले की, यंदा कारखाना निश्चित सुरू होणार आहे.

 ऍड. किसन यळ्ळूरकर म्हणाले की, कारखान्याच्या कामाची प्रगती असून शेतकऱयांच्या श्रमाला या ठिकाणी न्याय दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यवस्थापक एम. डी. मल्लूर यांनी कारखान्याची सविस्तर माहिती दिली. कंग्राळी बुद्रुक येथील कलमेश्वर सोसायटीच्या माध्यमातून कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी सातकोटीची भरीव मदत केल्याने त्यांचे सभासदवर्गाने टाळय़ा वाजवून अभिनंदन केले.

यंदा कारखान्याची निवडणूक होणार असून कारखान्यावर आर्थिक बोजा न टाकता निवडणूक बिनविरोध करावी. आम्हाला निवडणूक महत्त्वाची नसून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू व्हावा, ही बाब महत्त्वाची आहे, असे मत अनेक शेतकऱयांनी व्यक्त केले.

व्यासपीठावर  तानाजी पाटील, बसवंत मायाण्णाचे, शिवपुत्रप्पा माळगी, निलीमा पावशे, गीता होनगेकर, सुरेश डुकरे, मनोहर हुक्केरीकर, भारत शानबाग, सुमीत पिंगट, चेतनकुमार कांबळे, प्रभारी व्यवस्थापक निर्देशक एम. डी. मल्लूर, निवडणूक अधिकारी बी. एस. मंटूर, ऍड. किसन यळ्ळूरकर, मनोहर किणयेकर आदी सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आभार  मनोहर हुक्केरीकर यांनी आभार मानले.