|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मलप्रभा- महेशकुमारचा हृद्य सत्कार

मलप्रभा- महेशकुमारचा हृद्य सत्कार 

प्रतिनिधी/ बेळगाव

कुराश या नवख्या खेळात आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारी तुरमुरीची मलप्रभा जाधव आणि एशियन शालेय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकाविणारा अथणीचा महेशकुमार लंगोटी यांनी देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. या दोघांनाही गौरविण्याचा हृद्य सोहळा ‘तरुण भारत’ने आयोजित केला होता. दोन्ही खेळाडूंना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांची पाठ कौतुकाने थोपटण्यात आली. या सोहळय़ात या दोघांचेही प्रशिक्षक आणि मलप्रभाच्या माता-पित्यांचाही गौरव करण्यात आला.

‘तरुण भारत’चे सीईओ दीपक प्रभू, संपादक जयवंत मंत्री व मुख्य प्रतिनिधी उपेंद्र बाजीकर व्यासपीठावर होते. सत्कारमूर्ती म्हणून मलप्रभा जाधव व महेशकुमार लंगोटी तसेच मलप्रभाचे आई-वडील यल्लाप्पा व शोभा जाधव, प्रशिक्षक त्रिवेणी सिंग, जितेंद्र सिंग व तिला प्रेरणा दिलेले निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर उपस्थित होते. बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार आणि गजाननराव भातकांडे हायस्कूलचे चेअरमन मिलिंद भातकांडे यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती.

प्रारंभी स्वागत झाल्यानंतर उपेंद्र बाजीकर यांनी प्रास्ताविक केले. मलप्रभा आणि महेशकुमार यांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, असे सांगितले. यानंतर गौरव सोहळय़ास प्रारंभ झाला. ‘तरुण भारत’चे संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते मलप्रभा हिला पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सीईओ दीपक प्रभू यांनी महेशकुमार याचा गौरव केला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते मलप्रभाच्या आई-वडिलांचा गौरव झाला. ‘तरुण भारत’ परिवारातील सदस्या हेमा पाटील यांनी प्रशिक्षिका त्रिवेणी सिंग यांचा तर सीईओ दीपक प्रभू यांनी जितेंद्र सिंग व प्रकाश बेळगुंदकर यांचा सन्मान केला. यानंतर अविनाश पोतदार व मिलिंद भातकांडे यांनीही दोन्ही गौरवमूर्तींना पुष्पगुच्छ दिले.

बेळगावकरांचा आशीर्वाद

सत्काराला उत्तर देताना मलप्रभाने आपला तुरमुरी ते जकार्ता हा प्रवास, गुरुजनांनी दिलेली प्रेरणा, आई-वडिलांची साथ, प्रशिक्षकांची मेहनत, सराव आणि विशेष म्हणजे बेळगावकरांचा आशीर्वाद याची माहिती देताना सरावापेक्षा आशीर्वादाने आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकलो, अशी माहिती दिली. स्पर्धेवेळी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी स्वतः दिलेली प्रेरणा आणि कांस्यपदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मिळालेली शाही भोजनाची संधी आणि सत्कार या आठवणी सांगितल्या. आता ऑलिंपिक हे माझे ध्येय आहे. त्यासाठी तुम्हा साऱयांचा आशीर्वाद माझ्यासाठी मोलाचा ठरेल, असे उद्गार तिने काढले.

सीईओ दीपक प्रभू यांनी क्रीडा उपक्रम आणि खेळाडूंना ‘तरुण भारत’ने नेहमीच मोलाची साथ आणि प्रेरणा दिली आहे, अशी माहिती दिली. मलप्रभा आणि महेशकुमारने मिळविलेले यश अमूल्य असेच आहे. यापुढील काळात त्यांच्यासाठी ‘तरुण भारत’ परिवार सदैव मदतीस उभा राहील, असे त्यांनी सांगितले. संपादक जयवंत मंत्री यांनी मलप्रभाच्या आई-वडिलांचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील असूनही आपल्या मुलीला इतकी प्रेरणा देणाऱया या व्यक्तींचे योगदान तिच्या यशात मोठे आहे, असे ते म्हणाले.

ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत

अविनाश पोतदार यांनी ऑलिंपिक स्पर्धा हे ध्येय बाळगून आता मलप्रभाने वाटचाल करावी. खडतर मेहनत घेत आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत, असा मौलिक सल्ला देऊन आम्ही सर्व बेळगावकरांच्यावतीने तुला जे काही लागेल ते देण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास दिला. मदतीच्या या कार्यात आपला पहिला 25 हजारांचा वाटा मिलिंद भातकांडे यांनी जाहीर केला. प्रशिक्षक त्रिवेणी सिंग आणि जितेंद्र सिंग यांनी मलप्रभाला घडविताना दिलेल्या योगदानाची माहिती दिली. जितेंद्र सिंग यांनी तर स्वतःच्या नोकरीवर पाणी सोडून घेतलेल्या परिश्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाला ‘तरुण भारत’ परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. प्रसाद सु. प्रभू यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले..