|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गणेशमूर्ती

आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गणेशमूर्ती 

@ बेळगाव / प्रतिनिधी

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार अनेकजण करतात. परंतु गणेशमूर्ती आणताना मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच गणेशमूर्ती घरी आणतात. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळ व विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णपणे शाडूच्या बनविलेल्या गणेशमूर्ती प्रति÷ापित करण्याची जनजागृती करण्याबरोबरच त्यांची विक्रीही करीत आहेत.

यावषी असे इकोप्रेंडली 40 गणेशमूर्ती मागविण्यात आल्या आहेत. या गणेशमूर्ती अवघ्या 100 रुपयांमध्ये गणेशभक्तांना मिळणार आहेत. रासायनिक रंगांचा वापर न करता या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या विभागाचा हा पहिलाच प्रयत्न असून पुढील वषी हा उपक्रम मोठय़ा प्रमाणात राबविला जाणार आहे.

या गणेशमूर्ती तयार करताना त्यामध्ये बियाणे घालण्यात आले आहेत. त्यामुळे एखाद्या कुंडीतही गणरायाचे विसर्जन करता येऊ शकते. यावषी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी मूर्तींवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने या गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. या उपक्रमाचे कौतुकही होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ अल्प दरात या गणेशमूर्ती भक्तांना देणार असून, ज्यांच्याकडून या गणेशमूर्ती मागविण्यात आल्या आहेत त्यांना प्रत्येक मूर्तीमागे 100 रुपये प्रोत्साहन निधी देणार आहे.

येथे मिळणार गणेशमूर्ती

शिवबसवनगर येथील एस. जी. बाळेकुंद्री संस्थेच्या आवारातील विज्ञान केंद्र तसेच ऑटोनगर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात या गणेशमूर्ती भाविकांना मिळणार आहेत. भाविकांनी कार्यालयीन वेळेत येथे संपर्क साधावा.

राजशेखर पाटील (साहाय्यक विज्ञान केंद्र अधिकारी)

गणराय हा विघ्न दूर करणारा देव म्हणून ओळखला जातो. परंतु या गणरायासमोरच अनेक विघ्ने येत असल्याने नागरिकांनी शाडू किंवा पर्यावरणपूरक वस्तुंपासून बनविलेल्या गणेशमूर्ती खरेदी कराव्यात. यामुळे पर्यावरणालाही हातभार लागेल.