|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » पश्चिम बंगाल, बिहार भूकंपाने हादरले

पश्चिम बंगाल, बिहार भूकंपाने हादरले 

ऑनलाईन टीम / लखनऊ :

बिहार आणि पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर भारताला आज भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.5 एवढी होती. भूकंपाचे धक्के जाणवताच भिंती हालू लागल्याने लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले. भूकंपामुळे कोणतीही जीवीत वा वित्त हानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे.

आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले. सुमारे 25 ते 30 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. या भूकंपाचा केंद्र बिंदू बांग्लादेशातील रंगपूर येथे असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारच्या पूर्णिया, किशनगंज, अररिया, कटिहर, कूचबिहार, आणि पटना येथे हे भूकंपाचे धक्के जाणवले. तर पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी आणि काही भागातही भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपामुळे घरातील सामान खाली पडले आणि पंखे अचानक हलू लागल्याने मुलाबाळांसह लोकांनी तात्काळ घराच्याबाहेर पलायन केले.

नागालँड, आसाम, मणिपूरमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या आधी बुधवारी जम्मू-काश्मीर आणि हरयाणात भूकंपाचे झटके जाणवले होते. काश्मीरमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल वर 4.6 एवढी नोंदवण्यात आली होती. त्यानंतर आज पून्हा भूकंप झाल्याने पूर्वोत्तर भारत हादरून गेला आहे.