|Thursday, July 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गणेशोत्सवाची पार्श्वभूमी व बदललेले स्वरूप

गणेशोत्सवाची पार्श्वभूमी व बदललेले स्वरूप 

सध्या सर्वत्र जो होतो त्याला गणेशोत्सव म्हणायचे काय अशी टीका अनेकजण, विशेषतः उत्सवात भाग न घेणारे करतात. खरेतर बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव तसाच राहील ही अपेक्षा ठेवणे अप्रस्तुत आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केव्हा आणि कशी झाली, कुणी केली  यावर गेल्या काही वर्षांपासून वादविवाद चालू आहेत. या उत्सवाला सार्वजनिक रूप छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे येथे दिले असे दाखले इतिहासात मिळतात. त्यांच्या काळात, 1630 ते 1680 पर्यंत उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा केला गेला जात असे. त्या मागील त्यांचा उद्देश स्वराज्य संस्कृती लोकांना कळावी व त्यांच्यात देशभक्ती जागवावी हा होता. शिवरायांच्या मृत्यूनंतर बंद पडलेली सार्वजनिक गणेशपूजा 1718 पासून पेशव्यांनी पुन्हा सुरू केली. ती प्रथा 1818 पर्यंत कायम राखली गेली. पण सार्वजनिक गणपती पूजा पेशव्यांच्या पतनानंतर 1818 ते 1892 मध्ये बंद झाली व ती पूजा घरोघरी सुरू झाली.

  गणेश ही मंगलतेची देवता असल्याने कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते. भाऊसाहेब रंगारींनी त्यांच्या मंडळाचा गणपती 1892 मध्ये बसवला होता व त्याच्या दर्शनाला लोकमान्य टिळकही गेले होते असा उल्लेख आढळतो. वैयक्तिक आणि घरगुती स्वरूपाचा हा धार्मिक उत्सव लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी एकत्र येऊन लढा देण्यासाठी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रचार करून व अनेक मंडळांची स्थापना करण्यास प्रोत्साहन देऊन  1893 मध्ये खऱया अर्थाने सार्वजनिक केला. भारताची घटना लिहिण्यासाठी स्थापन झालेल्या समितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. त्यांना मदत करण्यासाठी 21 तज्ञ होते व घटनेचे वेगवेगळे विषय त्यांना वाटून देण्यात आले होते. बाबासाहेब स्वतः कायदेतज्ञ व अध्यक्षही असल्याने त्यांनाच घटनेचे शिल्पकार म्हटले जाते. तसे आता आपण पाहत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात करण्याचे शिल्पकार लोकमान्य टिळकानाच मानावे लागेल.

गणेशोत्सव हा आता केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही. तो आता लोकप्रिय सांस्कृतिक आणि जगभर पसरलेल्या गणेशभक्तांमुळे ग्लोबल उत्सव झाला आहे. पण हा मंगल उत्सव साजरा करताना आपण काही नवीन गोष्टीही लक्षात घ्यायला हव्यात. या सणाला असलेली पर्यावरणाची, श्रद्धेची, सहकुटुंब उपासनेची किनारही सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. हा सण सगळय़ांचा असल्याने इतर धर्माचे लोकही कसे भाग घेतील हे मंडळांनी पहायला हवे. अनेक मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन बौद्ध लोक आनंदाने गणेशोत्वात भाग घेतात. सार्वजनिक मंडळाच्या कमिटीवर या इतर धर्माच्या लोकांना घेता येईल का याचा विचार जरूर केला पाहिजे. घरात गरोदर महिला असेल तर गणपती विसर्जन करू नये हा गैरसमज असून याला कुठलाही धार्मिक आधार नाही. तसेच उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो असाही एक गैरसमज आहे. देव कधीही कडक, रागावणारा नसतो. तो नेहमी कृपाळू असतो कुणाचेही वाईट करत नाही अशा श्रद्धेने पूजा करावी.

आपले सर्व सण पर्यावरण पूरकच असतात. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश करण्याची प्राचीन प्रथा आहे. आपला देश कृषीप्रधान आहे. त्यामुळे शेतकरी जिला काळी आई म्हणतात त्या मातीच्या म्हणजेच पार्थिव गणपतीचे पूजन करावे असे शास्त्रात सांगितले आहे. पूर्वी गणेश मूर्तींची संख्या कमी होती. लोकसंख्या वाढी बरोबर गणेशमूर्तींची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. शिवाय पार्थिव गणपती फारसे कुणी बसवत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मातीचा गणपती बनवल्यास हा प्रश्न सोपा होईल. तोपर्यंत गणपतीविसर्जन कृत्रिम हौदातच करावे. निर्माल्याही नदीत टाकू नये. त्यावर पाणी शिंपडून म्हणजेच विसर्जित करून खत करण्यासाठी वापरावे. स्वातंत्र्य लढय़ासाठी सुरू झालेल्या या मंगल उत्सवाची आता सर्वांनीच आरोग्य, देशप्रेम, लोकशिक्षण, स्वच्छता अभियान, पर्यावरण रक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोन निर्मिती, सर्वधर्मसमभाव यासाठी उपयोगी उत्सव म्हणून साजरा करण्याची आवश्यकता आहे.

गणेश जन्मकथा

एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जायचे असताना बाहेर लक्ष देण्यास कोणीच नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको असे त्या मूर्तीला सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली. काही वेळाने भगवान शंकर तिथे आले व आत जाऊ लागले. त्या मूर्तीने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकऱयाचे शिरच उडवले.

पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर आपण तयार केलेल्या पहारेकऱयाला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक मूर्तीला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानसपुत्र गज (हत्ती) आणि आनन म्हणजे मुख असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश मूर्तिर्ची स्थापना केली जाते.

श्री गणेश प्रति÷ापना पूजा

 श्री गणेशाच्या प्रति÷ापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ. सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध 21 पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळय़ात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. त्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. उदा. शमी ही थंड गुणाची वनस्पती आहे. उष्णतेच्या विकारांवर शमीच्या पाल्याचा रस, जिरे आणि खडीसाखर एकत्र करून देतात. धोत्र्याची झाडे सर्वत्र उपलब्ध असतात. दम्याच्या विकारात कफ असेल तर धोत्र्याच्या पानांची धुरी देतात. सुजेवर धोत्र्याचा रस लावतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणतात. यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम। इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।। पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे.’ असा याचा अर्थ आहे. यानंतर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवावी. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करावे असे शास्त्र सांगते.

विलास पंढरी