|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » प्रभो…धन..गणपती…!

प्रभो…धन..गणपती…! 

गोवा आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनामुळे उत्साही बनला आहे. चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत हा माहौल उत्सवमय वातावरणात डुंबणार आहे. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडायचा असेल तर मानवनिर्मित विघ्नांचे आधी विसर्जन करावे लागेल.

गोवा आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनामुळे उत्साही बनला आहे. चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत हा माहौल उत्सवमय वातावरणात डुंबणार आहे. तसा दरवर्षी भाद्रपद चतुर्थीला हा सण येतो आणि गोमंतकीय तेवढय़ाच उत्सुकतेने त्याची वाट पाहतात. हिंदू शास्त्रपुराणात सर्व गणांचा अधिपती, कला व विद्येचा अधिष्ठाता असे गणपतीचे वर्णन केले आहे. हिंदू धर्मियांमध्ये कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने करण्याची प्रथा आहे. गणेशोत्सव हा सण धर्म व परंपरांपुरता मर्यादित नाही. संस्कृती, समाज, पर्यावरण अशा मानवी उत्थानाच्या विविध माध्यमांशी त्याचे नाते आहे.

गोवा, कोंकण व कर्नाटकातील काही भागात घरोघरी गणपती पूजनाची जुनी परंपरा आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात मात्र विशिष्ट हेतूने झाली. एतद्देशीयांमध्ये भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे स्फुल्लिंग जागविण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या गोष्टीला आता सव्वाशे वर्षे उलटली आहेत. टिळकांना अपेक्षित असलेले स्वराज्य मिळाले. ते पाहण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले नाही. स्वराज्याच्या जोडीलाच त्यांना सुराज्यही हवे होते. ज्या स्वातंत्र्याच्या पेरणेतून सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना साकारली, त्याच गणेशोत्सव मंडळावर सुराज्याचे उत्तरदायित्त्व आहे. गणेशोत्सव हे समाजाला एकत्र आणणारे व एका धाग्यात बांधणारे महत्त्वाचे माध्यम आहे. समाज प्रबोधन हा त्याचा प्रमुख उद्देश होता. आज या उत्सवाचा मूळ उद्देशच विसरला गेल्याने त्याचे स्वरुप हरवले आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे प्रबोधनापेक्षा धनाकडे या उत्सवाची वाटचाल सुरू आहे.

गणपती पूजनामध्ये निसर्गाची प्रेरणा आहे. त्यामुळेच गोव्यातील घरोघरी गणपती पूजताना निसर्गातील विविध फळे, फुले व वनस्पतींनी गणपती समोरील माटोळी सजविण्याची परंपरा आहे. या पारंपरिक माटोळीला हल्ली कलात्मक स्वरुप प्राप्त झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून गोवा सरकारच्या कला व संस्कृती खात्यातर्फे राज्यस्तरीय माटोळी स्पर्धाही आयोजित केली जाते. माशेल गावात ‘कलात्मक गणेश दर्शन’ ही संकल्पना रुजली असून हे गणपती पाहण्यासाठी गोव्यासह शेजारील राज्यातील भाविक गर्दी करतात. निसर्गाचे संवर्धन व्हावे, सर्वांना समृद्धी, आरोग्य लाभावे तसेच समाजातील एकता टिकून राहावी, ही या उत्सवामागील भावना आहे. हल्ली गणपती उत्सवाच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होताना दिसते. विसर्जन मिरवणुका सुखदायक होण्यापेक्षा तापदायक होत चालल्या आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत चालणारे कर्णकर्कश डिजे व इतर ध्वनी प्रदूषणाला आवर घालण्यासाठी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला आहे.

गणेशोत्सव हा कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देणारा सण मानला जातो. याच काळात रांगोळी, देखावे व इतर कलांना बहर येतो. पूर्वी गणपतीचे मखर व इतर सजावट ही निसर्गाशी अनुरुप असायची. मध्यंतरी मखर व देखाव्यांसाठी थर्माकोलचा बेसुमार वापर ही मोठी पर्यावरणीय समस्या बनून राहिली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यंदा गणेशोत्सवापूर्वी थर्माकोलवर बंदी घातली आहे. यापूर्वी चिनी मातीच्या मूर्तीमुळे असाच प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या मूर्तींवर आता नियंत्रण आले आहे. तरीही मूर्तीवर वापरल्या जाणाऱया रासायनिक रंगामुळे विसर्जनानंतर मोठय़ा प्रमाणात जल प्रदूषणाच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.  तलावातील मासे व इतर जलचरांवर विघ्न ओढवल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. गणपती विसर्जनाच्यावेळी देवाच्या अंगावरील फुले म्हणजेच निर्माल्य विसर्जनामुळेही नदी व तलावांमध्ये फुलांचा खच पडतो. निर्माल्य विसर्जन ही धार्मिक परंपरा असली तरी त्यातूनही नवीन पर्यावरणीय प्रश्न उभे राहत आहेत. गणेशोत्सवात फटाके उडवणे ही प्रथा न राहता आता प्रतिष्ठेचा प्रश्न बनून राहिला आहे. त्यामुळे फटाक्यांच्या धुरावर हजारो रुपयांचा चुराडा केला जातो. एखादी विसर्जन मिरवणूक निघाल्यानंतर त्या परिसरात काही तास दारूमिश्रित प्रदूषणाच्या धुराने आसमंत व्यापून जातो. या गोष्टी लक्षात घेतल्यास गणपतीचे पर्यावरणीय रूप आपण सहज विद्रुप करून टाकलेले दिसते. शहरामधील वाढते प्रदूषण ही सध्या चिंतेची बाब बनली आहे. त्यात अशा उत्सवांच्या माध्यमातून भर पडत आहे. या गोष्टींचा विचार उत्सव साजरा करताना प्रत्येकाला करावा लागेल.

गोवा व महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवांची मोठी परंपरा आहे. मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे या महानगरांमध्ये अनेक गणेशोत्सव मंडळांना शंभर वर्षांची परंपरा आहे. प्रबोधनाच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही मंडळे आज प्रबोधन विसरून केवळ धनात स्वारस्य मानताना दिसतात. काही सांस्कृतिक कार्यक्रम, शिष्यवृत्ती व गौरव, सत्कार सोहळे सोडल्यास या मंडळांचे कार्य पुढे जाताना दिसत नाही. त्यामध्ये काही अपवाद असलेल्या मंडळांनी प्लास्टिकमुक्ती व इतर काही विधायक उपक्रम राबवून मूळ उद्देश जपलेला आहे. त्यामुळे बहुतांश मंडळांनाच सध्या प्रबोधनाची गरज भासू लागली आहे. भक्त मंडळींच्या आर्थिक पाठबळावर सार्वजनिक गणेशोत्सवाचा डोलारा उभा राहतो. मात्र समाजाच्या हितासाठी ही मंडळे कितपत योगदान देतात, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. हल्लीच केरळ राज्यात आलेल्या महापुरात हजारो नागरिक बेघर झाले. या पूरग्रस्तांसाठी समाजातील विविध स्तरांतून मदतकार्य सुरू झाले. त्यात गणेशोत्सव मंडळे कमीच होती. रक्तदान, नेत्रदान, अवयवदान ही सध्या समाजाची गरज आहे. आरोग्य शिबिरे, गरीब गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मदत लागते. समाजाच्या देणग्यांमधून सधन बनलेल्या मंडळांना हे सहज शक्य आहे. दरवर्षी मंडळातर्फे देणगी कुपन्स काढली जातात. या देणगी कुपनांवरील काही वाटा अशा विधायक कार्यासाठी जाहीर केल्यास त्याचा समाजातील विविध घटकांना निश्चितच लाभ होईल. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडायचा असेल तर मानवनिर्मित विघ्नांचे आधी विसर्जन करावे लागेल.

सदानंद सतरकर