|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कृष्णालाही विरह व्यथा

कृष्णालाही विरह व्यथा 

असह्य विरहवेदनांमुळे गोपी रडू लागल्या. नुसत्या गीताने तर काहीच झाले नाही. नुसते गुणगान नाही, रडणेसुद्धा आवश्यक आहे, गोपी रडू लागल्या आणि परमात्मा प्रकट झाले.  प्रभूसाठी साधना करून थकलेला जीव रडू लागतो तेव्हा दयेने प्रभु प्रकट होतात. रामकृष्ण परमहंसांनी म्हटले आहे की पत्नी, पुत्र इत्यादींच्या मृत्यूच्या वेळी किंवा पैसा मिळविण्यासाठी लोक अश्रूंच्या नद्या वाहवतात. परंतु ईश्वराचे दर्शन झाले नाही म्हणून दु:खाने भगवंतासाठी अश्रूंचा एक तरी बिंदू गाळणारे किती आहेत? आपल्या अनुभवांचे वर्णन करून त्यांनी म्हटले आहे-संध्याकाळच्या वेळीसुद्धा मला आईचे दर्शन झाले नाही तर मला रडू येत असे. मी रडता रडता जमिनीवर पडून जात असे. मग शेवटी आईचे दर्शन होई. दर्शनप्राप्तीसाठी अत्यंत व्याकुळतेने डोळय़ातून अश्रुधारा वाहाव्यात तेव्हा भगवान अवश्य दर्शन देतील. गोपींचे आक्रंदन कृष्णाकडून पाहवले नाही. गोपी अभिमानरहित दीन होऊन रडत होत्या, म्हणून कृष्ण प्रकट झाले. भक्त जेव्हा भगवंतासाठी आक्रंदन करतो तेव्हा ते प्रकट होतात. आम्ही दीनतेने रडून रडून हाका मारू तर भगवान प्रकट होतील आणि अभयदान देतील. परमात्मा संपूर्ण प्रेम इच्छितो. वेडे झाल्याशिवाय परमात्मा भेटत नाही. कामांध कामामागे, लोभी धनाच्या मागे आणि भक्त भगवंताच्या मागे वेडे होत असतात. जोपर्यंत जीव संसारातील जड पदार्थावर प्रेम करीत राहतो तोपर्यंत ईश्वराला दया येत नाही. परमात्म्याला प्रसन्न करण्याचे साधन हेच आहे की जीवाने विरह व्याकुळतेने भगवंतासाठी अश्रू ढाळीत राहावे. कृष्ण प्रकट झाले आणि सगळय़ांना आनंद झाला. काही लोक प्रेम करणाऱयांवर प्रेम करतात तर काही प्रेम न करणाऱयांवरही प्रेम करतात आणि काही असेही आहेत की जे कोणावरच प्रेम करीत नाहीत. प्रेमदात्यावर प्रेम करणारा स्वार्थी आहे. बालकाने प्रेम केले नाही तरी आईबाप त्याच्यावर प्रेम करतातच. गोपींनी कृष्णाला विचारले-आपण या तीनपैकी कोणत्या प्रकारचे प्रेमी आहात? भगवान म्हणाले-मी तर या तिन्ही प्रकारांच्या पुढे आहे. तुमचे प्रेम मी जाणतो. माझ्या वियोगामुळे तुम्हाला दु:ख तर झाले, पण विशिष्ट योगाचे दान करण्यासाठीच वियोग दिला होता. (संयोगावस्थेपेक्षा विरहावस्थेत प्रेमपात्राशी अधिक तादात्म्य होते. म्हणून वियोगाला एक विशिष्ट प्रकारचा योग म्हटले आहे. या योगाचे दान करण्यासाठीच कृष्ण अदृश्य झाले होते आणि या प्रकारे गोपींना आणखीनच निकट आणले गेले. गोपी कृष्णचिंतनात अशा तल्लीन झाल्या की बाहेर विरह असतानासुद्धा अंतरंगात संयोग होता) भगवान गोपींना म्हणतात-या वियोगात तुमच्यापेक्षा मलाच अधिक व्यथित व्हावे लागले. तुम्ही सर्व तर एकमेकींचे सांत्वन करीत होत्या. व्याकुळ ललिताचे विशाखा सांत्वन करीत होती, तर विशाखाचे चंद्रावती सांत्वन करीत होती, परंतु इकडे मी एकटाच रडत होतो. माझे सांत्वन करणारे तर कोणीच नव्हते.