|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वसुधैव कुटुंबकम

वसुधैव कुटुंबकम 

परवा काही कारणास्तव एका रुग्णालयातल्या ओपीडीमध्ये चार तास बसावे लागले. रुग्णांची आणि नातलगांची प्रचंड गर्दी होती. डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर सेवक वर्ग धावपळीत होता. गर्दीत एका बाकावर कसाबसा अंग चोरून बसलो होतो. रुग्ण किती प्रकारचे होते. सर्व वयोगटातले होते. चाकांच्या खुर्चीवर किंवा स्ट्रेचरवर… अंगावर विविध यंत्रे, नळय़ा, सलाईनच्या बाटल्या जोडलेले… किंवा पट्टय़ा बांधलेले… सगळे इतके करुण की जगण्यावरचा विश्वास उडावा, भीती वाटावी… या सगळय़ांची आयुष्यरेषा वाढवण्यासाठी डॉक्टर्सच्या माध्यमातून धडपडणाऱया मानवाचे देखील कौतुक वाटून गेले.

दारातून बाहेर पाहिलं की हिरवीगार झाडे दिसत होती. एका झाडाच्या फांद्या कापून त्याला सुशोभित सोयीचा आकार देऊन खाली बसण्यासाठी बाके ठेवली होती.

ही दोन चित्रे पाहून मनात विचार आला. ही झाडे आणि वनस्पती वगैरे लहान-मोठी, दणकट-नाजूक, सुंदर बेढब, निरोगी-आजारी, सुगंधी-साधी कशीही असतात. यातील काही आपल्या मदतीशिवाय देखील वाढू शकतात. ही झाडे आणि वनस्पती आपल्या जगण्याच्या आड येत नाहीत.

आपण माणसे दुष्ट असतो. रहायला जागा हवी म्हणून आपण जंगले जाळतो. आपल्या गरजेसाठी झाडांच्या फांद्या, फळे, फुले तोडतो. त्यांची कत्तल करतो. आपल्या सोयीसाठी त्यांचा वंशसंहार करतो. आपण आपल्यापेक्षा लहान आकाराच्या प्राण्यांची-पक्ष्यांची-जलचरांची शिकार करतो. विणीच्या हंगामात विविध मासे जाळय़ात पकडून मारले जातात. ते कापून विकायला ठेवतात तेव्हा त्यांच्या पोटातले गर्भातले जन्माला येऊ बघणारे जीव देखील दिसतात. तंदूरची चव छान लागते या नावाखाली काही जिवांच्या माद्यांना आपण जिवंत जाळतो आणि खातो. मांसाहाराविरुद्ध प्रचार करण्यासाठी मी हे लिहीत नाहीये. माझा मुद्दा वेगळा आहे. या सजीव सृष्टीप्रमाणे आपण माणसे देखील लहान-मोठी, दणकट-नाजूक, सुंदर बेढब, निरोगी-आजारी वगैरे असतो. स्वतःचे वंश वाढवीत पृथ्वी व्यापत असतो.

कदाचित विश्वात सगळीकडे भरून असलेल्या सूक्ष्म जिवांचे (बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे) देखील आपल्यासारखे विश्व असणार. ते त्यांच्या गरजेसाठी, किंवा त्यांना जागा हवी म्हणून आपल्या शरीरात शिरून आपल्याला अपंग किंवा ठार करीत असतील.

आपण झाडांशी, प्राण्यांशी जसे वागतो, तसेच हे सूक्ष्म जीव आपल्याशी वागतात की काय? आपण सगळे या पृथ्वीवर प्रेमाने राहू शकणार नाही का?

Related posts: