|Monday, June 17, 2019
You are here: Home » उद्योग » रेल्वेच्या 100 टक्के विद्युतीकरणास मंजुरी

रेल्वेच्या 100 टक्के विद्युतीकरणास मंजुरी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहार समितीच्या बैठकीत रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणास मंजुरी देण्यात आली. सरकारकडे आलेल्या 13,675 किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणास 12,134.50 कोटी रुपये खर्च येणार असून त्यासाठी 2021-22 मुदत देण्यात आले. ब्रॉड गेज मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण झाल्याने रेल्वे सुरक्षा, प्रवासी क्षमता आणि वेग वाढण्यास मदत होईल. याचप्रमाणे प्रतिवर्षी इंधन बिलात 13,510 कोटीची बचत होईल, असे सांगण्यात आले.

सध्या भारतीय रेल्वेकडून प्रतिवर्षी उच्च प्रतिच्या 2.83 अब्ज लिटर डिझेलचा वापर करण्यात येतो. हा वापर कमी झाल्याने पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत होईल. कार्बन उत्सर्जन घटविण्यास रेल्वेकडून हातभार लागेल. या प्रस्तावानुसार देशभराती 108 सेक्सनचे विद्युतीकरण पूर्ण होईल. विद्युतीकरणामुळे रेल्वेमागाची क्षमता वाढण्यास आणि सरासरी वेग वाढण्यास मदत होईल असे सांगण्यात आले.

सध्या देशात दोन-तृतीयांश मालवाहतूक आणि निम्मी प्रवास वाहतूक विद्युतीकरण झालेल्या मार्गावर होते. भारतीय रेल्वेच्या इंधनावरील एकूण खर्चापैकी 37 टक्के विजेवर होतो. इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हचा देखभाल खर्च 16.45 रुपये प्रति हजार एकूण टन किमी आहे, तर डिझेलचा हा खर्च 32.84 रुपये आहे. रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाल्याने कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च घटण्यास मदत होईल, असे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले.