|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चिपीत खासगी विमान उतरविण्याचा अट्टाहास का?

चिपीत खासगी विमान उतरविण्याचा अट्टाहास का? 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे टिकास्त्र : पायाभूत सुविधा, आवश्यक परवानगी अद्याप नाहीत : पालकमंत्र्यांनी दहा लाख रु. भाडय़ाने खासगी विमान आणले!

‘विमानतळ सुरू होण्यासाठी आवश्यक परवानगी मिळविण्याचे काम सुरू आहे. बासष्टपैकी आतापर्यंत वीस प्रकारच्या परवानगी मिळाल्या

आहेत. डीझीसीएची परवानगी अद्याप नाही. तरीही खासगी विमान उतरविण्याचा अट्टाहास का? -नारायण राणे

कार्यक्रम अनधिकृत

सेनेचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न

वार्ताहर / कुडाळ:

 चिपी-परुळे विमानतळ सुरू करण्यापूर्वीच्या पायाभूत सुविधा तसेच आवश्यक परवानगी अद्याप तेथे नाहीत. असे असताना खासगी विमान उतरविण्याचा अट्टाहास का? पालकमंत्र्यांनी दहा लाख रु. भाडय़ाने खासगी विमान आणले, असे सांगत हा कार्यक्रम अनधिकृत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केला. आपण आणलेल्या प्रकल्पांना खो घालणारी शिवसेना श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

 चिपी विमानतळावरील आजच्या विमान लँडिंग कार्यक्रमाबाबत राणे यांनी येथील एमआयडीसी विश्रामगृहावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, या पर्यटन जिल्हय़ात विमानतळ व्हावा, यासाठी आपण प्रयत्न करून जागाही निवडली. एमआयडीसीमार्फत म्हसकर यांच्या कंपनीला काम देण्यात आले. त्या ठेकेदाराने खर्च करावा, अशा पद्धतीने काम देण्यात आले. 2014 पर्यंत विमानतळ बांधकाम व धावपट्टीचे बरेचसे काम पूर्णत्वास आले होते. पण गेल्या चार वर्षांत उर्वरित कामासाठीचे प्रयत्न सत्तारुढ किंवा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले नाहीत.

बासष्टपैकी आतापर्यंत वीस परवानगी मिळाल्या!

 विमानतळ सुरू होण्यासाठी आवश्यक परवानगी मिळविण्याचे काम सुरू आहे. बासष्टपैकी आतापर्यंत वीस प्रकारच्या परवानगी मिळाल्या आहेत. डीझीसीएची परवानगी अद्याप नाही. असे असताना खासगी विमान उतरविण्याचा अट्टाहास का? असा सवाल राणे यांनी करून हा कार्यक्रम ना एमआयडीसी, ना म्हसकर यांच्या कंपनीचा आणि केंद्र किंवा राज्य सरकारचाही नाही, असे त्यांनी सांगितले.

..मग आता नौटंकी कुणासाठी व का?

 3400 मी. धावपट्टीची लांबी असताना ती 2500 मी. केली आहे. हा विमानतळ रद्द करण्याची तयारी होती. तो सुरू करण्यासाठी आपण भाग पाडले. पाणी, वीज अशा सुविधा अद्याप तेथे नाहीत. शिवसेनेने जागा संपादनापासून आतापर्यंत या विमानतळाला विरोध केला होता. मग आता विमानतळ सुरू करण्यासाठी दहा लाख रु. भाडय़ाने खासगी विमान उतरविण्याची पालकमंत्री यांची नौटंकी कुणासाठी व का? असा सवाल राणे यांनी केला.

कोणत्याही चाचण्या झाल्या नाहीत!

 वादवा या बिल्डरचे हे विमान आणले. चाचणी घेणारे अधिकारी लागतात. ते नव्हते. कोणत्याही चाचण्या झाल्या नाहीत. खासगी माणसे आली. सरकारचे कुणीही नव्हते. चाचणीचा कार्यक्रम असा होत नाही. हा बेकायदेशीर कार्यक्रम असून योग्य परवानगी घेऊन नियमाने कार्यक्रम व्हावा. न बोलविताही आम्ही उपस्थित राहू, असे त्यांनी सांगितले.

केसरकरांच्या हट्टामुळे प्रभूंची परवानगी!

 केंद्रीय उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी आपण चर्चा केली होती. 12 सप्टेंबरला विमानाची चाचणी घेऊ. मी तुम्हाला तेथे घेऊन जाईन, असे त्यांनी आपणाला सांगितले होते. मात्र, संबंधित कंपनीने आवश्यक परवानगी न काढल्याने तो चाचणी कार्यक्रम होऊ शकला नाही. प्रभू या कार्यक्रमाला नव्हते. केसरकर यांनी दिल्ली येथे जाऊन प्रभूंकडे हट्ट धरला. अश्रू ढाळले. त्यामुळे प्रभूंनी त्यांना परवानगी दिली, असे राणे म्हणाले.

आजचा कार्यक्रम दिखावू!

 शिवसेनेचा जिल्हा विकासाशी काहीही संबंध नाही. ओरोस-आयटीआय, दोडामार्गöएमआयडीसी, सी-वर्ल्ड, रेडी बंदर, विमानतळ या विकासकामांना खो घालणाऱया शिवसेनेने आम्ही काही तरी करतो हे दाखविण्यासाठी आजचा कार्यक्रम केला, असा आरोपही त्यांनी केला. आमदार नीतेश राणे तसेच दत्ता सामंत, सतीश सावंत, रणजीत देसाई, विकास कुडाळकर, अशोक सावंत, अस्मिता बांदेकर, दीपक नारकर, संजू परब, विनायक राणे तसेच नगरसेवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.