|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मनःकामना पुरती!

मनःकामना पुरती! 

चिपीत विमानाचे यशस्वी लँडिंग-टेकऑफ : सिंधुदुर्गवासीयांसाठी ऐतिहासिक क्षण : सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक तुरा : ‘फाल्कन 2000’ चिपीत उतरले : ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष : सकाळी 11.51 वाजता लँडिंग : दुपारी 1.46 वाजता टेकऑफ

प्रमोद ठाकुर / परुळे:

 चिपी-परुळेच्या माळरानावर उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग एअरपोर्टवर बुधवारी सकाळी चेन्नई येथून आलेले ‘फाल्कन 2000’ हे विमान चाचणीसाठी दुपारी 11.51 वाजता यशस्वीरित्या लँडींग झाले. साक्षात गणरायाला घेऊन विमान उतरल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करण्यात आला. कोकण रेल्वेनंतर सिंधुदुर्गच्या विकास क्रांतीला हातभार लावणारा विमानतळ प्रकल्प लवकरच प्रवासी वाहतुकीला खुला व्हावा, असे गाऱहाणे उपस्थित सिंधुदुर्गवासीय व चाकरमान्यांनी गणरायाला घातले.

या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचा मान अनेकांनी मिळविला. हा क्षण टिपण्यासाठी शेकडो कॅमेरे, मोबाईल पुढे सरसावले. सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी आमदार पुष्पसेन सावंत, अजित गोगटे व राजन तेली, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आयआरबीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर होशिंग, एअरपोर्ट संचालक किरणकुमार, प्रकल्प प्रमुख राजेश लोणकर, कार्पोरेट प्रमुख विवेक देवस्थळी, जनसंपर्क अधिकारी जयंत डांगरे व योगेश म्हेत्रे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. गेले आठ दिवस चिपी विमानतळाची चाचणी करण्यासाठी विमान लँडींग व टेक ऑफ होणार, असे सांगण्यात आल्यानंतर जनतेची उत्सुकता वाढली होती. अखेर बुधवारी विमान लँडींग झाल्यानंतर लोकांनी टाळय़ा वाजवून आनंद व्यक्त केला.

दहा वाजल्यापासूनच लोकांची गर्दी

 चिपी विमानतळावर चाचणीसाठी विमान लँडींग होणार हे पाहण्यासाठी पंचक्रोशीसह जिल्हय़ातील लोकांनी सकाळी दहा वाजल्यापासून विमानतळाकडे येण्यास सुरुवात केली होती. परुळे-आदिनारायण मंदिरापासून विमानतळापर्यंत सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विमानतळाबाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. विमानतळावरही सिंधुदुर्ग पोलिसांचे संरक्षण दल तैनात होते.

मान्यवरांचे आगमन

 जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम हे वेळेपूर्वीच विमानतळावर पोहोचले. त्यांनी सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह राजकीय नेते, पदाधिकारी विमानतळावर दाखल झाले. 

‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष

 त्यानंतर विमान वळवून चालवित पॅसेंजर टर्मिनल पॉईंटकडे आणण्यात आले. 11.57 वाजता विमान येऊन थांबले. त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच आयआरबीचे अधिकारी विमानाकडे गेले. 12 वाजून 16 मिनिटांनी गणपतीची सुरक्षित ठेवलेली मूर्ती विमानातून बाहेर काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणा देण्यात आल्या. आयआरबीचे जनसंपर्क प्रमुख योगेश म्हेत्रे यांनी ही मूर्ती घेतली. नंतर वाजत-गाजत गणरायाला विमानतळाच्या कार्यालयात आणून आसनस्थ करण्यात आले. तत्पूर्वी सुहासिनींनी ओवाळले. केसरकर, राऊत, आमदार वैभव नाईक, राजन तेली, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर  विनिता राणे व अन्य उपस्थितांनी गणरायाचे दर्शन घेतले. नेरुर येथील श्री कलेश्वर-नवदुर्गा ढोलपथकाने राजश्री नेवगी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमात रंगत आणली.

विमानातून आणलेल्या गणेश मूर्तीचे गुरुवारी पूजन करून दीड दिवसांनी विसर्जन करण्यात येणार आहे.

कॅप्टन भारत यांना पहिले विमान उतरविण्याचा मान

 चाचणीसाठी आलेल्या विमानाचे पायलट कॅप्टन भारत होते. त्यांना चिपी विमानतळावर पहिले विमान उतरविण्याचा मान मिळाला. या विमानात अक्षय थप्पी व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील देवगड येथील पूनम मोंडकर यांनी को-पायलट म्हणून काम पाहिले. त्यांचाही सत्कार करण्यात आला. पूनम ही सिंधुदुर्गची कन्या म्हणून विशेष उल्लेख करण्यात आला. दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी विमानाने टेक ऑफ घेतला. त्याचाही आनंद अनेकांनी घेतला.

सात मिनिटे आकाशातच घेतले राऊंड

 विमान येणार, दिसते का?, असे विचारत प्रत्येकजण त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा प्रयत्न करीत होता. बुधवारी सकाळी 11.44 वाजता विमान दिसू लागले. विमानाने पॅसेंजर टर्मिनलवरून पुन्हा पूर्व दिशेला जाऊन आकाशातच एक राऊंड घेतले आणि 11 वाजून 51 मिनिटांनी विमान लँडींग झाले. आकाशातून धावपट्टीवर खाली येत सुसाट वेगाने ते स्टॉप पॉईंटकडे गेले. हा सुखद क्षण सर्वांनीच डोळय़ात साठविला. तत्पूर्वी लोकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने दूर थांबविण्यात आले होते. त्यांना विमान व गणपती पाहता यावा, यासाठी लॉबीपर्यंत येऊ देण्याच्या सूचना पालकमंत्री केसरकर यांनी गेडाम यांना दिल्या.