|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » रुपयातील तेजीने बाजार वधारला

रुपयातील तेजीने बाजार वधारला 

सेन्सेक्स 304 अंकाने मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

रुपयामध्ये काही प्रमाणात तेजी परत आल्याने सलग दोन सत्रात होणारी घसरणीला ब्रेक लागला. रुपयाची होणारी घसरण थांबविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने बाजारात तेजी परत आली.

बीएसईचा सेन्सेक्स 304 अंकाने मजबूत होत 37,717 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 82 अंकाच्या तेजीने 11,369 वर स्थिरावला.

बुधवारी रुपयाने 72.91 चा नवीन तळ गाठला होता. मात्र नंतर यामध्ये तेजी परत आली. रुपया अजून घसरता नये यासाठी सर्व पावले उचलण्यास केंद्र सरकार तयार असल्याचे अर्थ व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सांगितले. ब्रेन्ट तेलाच्या किमतीत वाढत असून प्रतिपिंप किंमत 79 डॉलरवर पोहोचली आहे.

रुपयाने सार्वकालिक निचांक गाठल्यानंतर सकारात्मक संकेत आल्याने तेजी परत आली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संकेत अजूनही समाधानकारक नसल्याने फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीवर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. कमजोर रुपया आणि चालू खाते तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात आल्यास बाजारात तेजी येण्याची शक्यता गिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनीसांगितले.

सेन्सेक्समध्ये पॉवरग्रिड समभाग 3.40 टक्के आणि आयटीसी 3.11 टक्क्यांनी मजबूत झाला. सन फार्मा, अदानी पोर्ट्स, कोटक बँक, टाटा स्टील, वेदान्ता, हिंदुस्थान युनिलिवर, इन्फोसिस, विप्रो, बजाज ऑटो, एचडीएफसी, ओएनजीसी यांच्या समभागात तेजी होती. ऍक्सिस बँक, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक यांच्या घसरण झाली.

एफएमसीजी निर्देशांक 2.40 टक्के, धातू 1.52 टक्के, भांडवली वस्तू 1.06 टक्के, आरोग्यसेवा 0.76 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू 0.66 टक्क्यांनी वधारले. दूरसंचार, रिअल्टी, बँकेन्समध्ये घसरण झाली. बीएसईचा मिडकॅप 0.52 टक्के आणि स्मॉलकॅप 0.27 टक्क्यांनी वधारले.