|Friday, April 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केरळमध्ये पूर येणारच होता…!

केरळमध्ये पूर येणारच होता…! 

जल आयोगाचा अहवाल : पूरासाठी केवळ धरणे कारणीभूत नाहीत

वृत्तसंस्था/ कोची

 केरळमध्ये मागील महिन्यात पुराने मोठा विध्वंस घडवून आणला होता. या भीषण पुरामागे धरणे कारणीभूत असल्याचे मानले जात होते. परंतु केंद्रीय जल आयोगाच्या अहवालाने ही शंका दूर केली आहे. धरणांमुळे पूरपातळीवर कोणताही प्रभाव पडलेला नाही. जून-जुलै 2018 मध्ये सरासरीहून अधिक पडलेला पाऊसच पूराचे मुख्य कारण असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालानुसार जून-जुलैमध्ये अधिक पावसामुळे 14 ऑगस्टपर्यंत बहुतेक धरणांमधील पाणीसाठा पूर्ण होत आला होता. धरणांमधील साठा काही प्रमाणात कमी असता तरीही पूरपातळीवर कोणताही प्रभाव पडला नसता. तीन-चार दिवसांपर्यंत तीव्र वादळ आणि पावसामुळे ही धरणे भरून गेली असती आणि कोणत्याही स्थितीत त्यातून विसर्ग करणे भाग पडले असते.

राज्यातील धरणे ही उन्हाळय़ातील गरजा पूर्ण करण्यासाठी बांधण्यात आली आहेत. आम्ही मान्सूनचा अंदाज घेत धरण पूर्वीच रिकामे करू शकत नसल्याचे केरळ धरण सुरक्षा प्राधिकरणाचे अध्यक्ष सी.एन. रामचंद्रन यांनी सांगितले. त्यांनी केंद्रीय जल आयोगाच्या अहवालाचे स्वागत केले आहे.

केरळमध्ये 57 मोठी धरणे असून यातील 4 धरणांचे संचालन तामिळनाडूद्वारे केले जाते. यांची एकूण साठवण क्षमता सुमारे 5.806 अब्ज क्यूबिक मीटर इतकी आहे. हे प्रमाण केरळमधून वाहणाऱया 44 नद्यांच्या वार्षिक सरासरी प्रवाहाच्या 7.4 टक्के म्हणजेच सुमारे 78 अब्ज क्यूबिक मीटर इतके आहे.

1 ते 20 ऑगस्ट या कालावधीत राज्यात 771 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. 1931 नंतर इतका पाऊस कधीच पडला नव्हता. 1931 मध्ये केरळमध्ये ऑगस्ट महिन्यात 1132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती अशी माहिती हवामान विभागाचे पदाधिकारी पुलक गुहाठाकुरता यांनी दिली.

Related posts: