|Friday, November 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तेलगू देसम पक्ष-काँग्रेस यांच्यात आघाडी

तेलगू देसम पक्ष-काँग्रेस यांच्यात आघाडी 

तेलंगणा राज्यासाठी निर्णय : डाव्यांचीही साथ मिळणार : केसीआर यांची कसोटी लागणार

वृत्तसंस्था/ हैदराबाद

 तेलगू देसम पक्ष आणि काँग्रेसने पहिल्यांदाच तेलंगणा विधानसभा निवडणूक एकत्र येत लढविण्याचा निर्णय घेतला आहे. डाव्या पक्षांनी देखील या आघाडीत सामील होण्याची घोषणा केली आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी पहिल्या टप्प्याच्या बैठकीनंतर राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांची भेट घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तेलंगणा राष्ट्रसमिती प्रमुख आणि काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात डिसेंबरपर्यंत निवडणूक घेतली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 कट्टर विरोधक एकत्र

चंद्रशेखर राव हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असल्याने निष्पक्ष निवडणूक होऊ शकत नाही. राष्ट्रपती राजवट लागू केल्यावरच राज्यात निवडणूक घेतली जावी, असे काँग्रेस, टीडीपी आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. टीडीपीच्या 35 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या पक्षाने काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. टीआरएसने विधानसभा विसर्जित केल्याच्या काही वेळातच 105 उमेदवारांची घोषणा देखील केली होती.

टीआरएस-भाजपला पराभूत करणार

टीआरएस आणि भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. अद्याप जागावाटपाबद्दल चर्चा व्हायची असल्याचे काँग्रेस नेते उत्तमकुमार रेड्डी यांनी सांगितले. टीडीपीबद्दल आम्ही कधीच शत्रुत्व बाळगले नव्हते, असा दावा काँग्रेसचे तेलंगणा प्रभारी आर.सी. खुंटिया यांनी केला. आंध्रप्रदेशला विशेष पॅकेज देण्याच्या मागणीवरून टीडीपीने रालोआतून काढता पाय घेतला होता. टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू मागील काही काळापासून काँग्रेसच्या गोटात दिसून येत आहेत.

निवडणूक टाळली जावी

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मुदतपूर्व निवडणूक टाळण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. सरकारने कार्यकाळ पूर्ण करावा अशी जनतेची इच्छा असल्याचे ओवैसी यांनी म्हटले.

विधानसभा विसर्जित…

तेलंगणामध्ये पहिल्या विधानसभेसाठी मे 2014 मध्ये निवडणूक झाली होती. या विधानसभेचा कार्यकाळ मे 2019 मध्ये पूर्ण होणार होता. परंतु राव हे वर्षाअखेरीस होणाऱया 4 राज्यांच्या निवडणुकीसोबत तेलंगणात निवडणूक घेऊ इच्छितात. मुदतपूर्व निवडणुकीसाठी राव यांनी 6 सप्टेंबर रोजी विधानसभा विसर्जित करण्याची घोषणा केली होती. राज्यातील विरोधी पक्षांनी टीआरएसच्या या निर्णयाला लोकशाहीविरोधी ठरविले होते.

Related posts: