|Thursday, April 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अर्थमंत्र्यांना भेटल्याचा मल्ल्याचा दावा

अर्थमंत्र्यांना भेटल्याचा मल्ल्याचा दावा 

लंडन / वृत्तसंस्था

भारतातून बाहेर पडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांची आपण भेट घेतली होती, व त्यांना बँकांची कर्जे भागवण्याचा प्रस्ताव दिला होता, असा दावा 9000 कोटी रूपयांसह भारतातून पळालेल्या विजय मल्ल्या याने केला आहे. लंडन येथील न्यायालयात त्याच्या विरोधात चाललेल्या प्रत्यार्पण प्रकरणात त्याने हा दावा केला. त्यावेळचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी या दाव्याचा ठाम इन्कार केला असून विजय मल्ल्याला कधीच भेटलो नसल्याचा खुलासा केला आहे.

मल्ल्या याच्या विरोधातील प्रकरणाची सुनावणी येथील न्यायालयात पार पडली. त्यात सीबीआयने मुंबई कारागृहातील सोयी सुविधांचे व्हिडीओ चित्रण सादर केले. मल्ल्या यांच्या वकीलांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले. मल्ल्या या प्रकरणातील बळी असून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. ते प्रामाणिक असून केवळ व्यवसायात तोटा आल्याने त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत. व्यवसायात तोटा येणे हा गुन्हा नाही, असा युक्तीवाद मल्ल्याच्या वतीने करण्यात आला.

अर्थमंत्र्यांचा उल्लेख केला

युक्तीवादात मल्ल्याने भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांची भेट घेतल्याचा उल्लेख केला. भेट घेऊन आपण त्यांना कर्जफेडीविषयी प्रस्ताव दिल्याचा दावा करण्यात आला. आपण कर्जबुडवे नसून केवळ व्यवसायात फटका बसल्याने संकटात आहोत, असेही सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.

10 डिसेंबरला निकाल शक्य

मल्ल्या याच्या प्रत्यार्पणावर 10 डिसेंबरला निकाल शक्य आहे. न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून आता निकालाची प्रतीक्षा आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी मल्ल्याला भारतात ज्या कारागृहात ठेवण्यात येईल, त्यातील सोयी सुविधांचे चित्रण पाठविण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार हे चित्रण सादर करण्यात आले. न्यायाधीशांनी ते तीनवेळा पाहिले, असे सांगण्यात आले. आता 10 डिसेंबर हा निकालाचा दिनांक म्हणून घोषित करण्यात आला आहे.

काँगेसचा भाजपवर आरोप

मल्ल्या आणि जेटली यांच्यात काय ठरले याची माहिती देण्याचा आग्रह काँगेसने धरला आहे. तथापि, जेटली यांनी मल्ल्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही, असे स्पष्ट केले. मल्ल्या यांनी राज्यसभेच्या परिसरात आपल्याला भेटण्याचा प्रयत्न केला, तथापी, आपण त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही, तसेच भेटीची वेळही दिली नाही, असे जेटलींचे म्हणणे आहे.

Related posts: