|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काँग्रेसचा पलटवार

काँग्रेसचा पलटवार 

‘ऑपरेशन कमळ’ला आव्हान : भाजप आमदार फोडण्याचा इशारा

प्रतिनिधी/ बेंगळूर

निजद-काँग्रेस युती सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांनी चालविलेले प्रयत्न फोल ठरविण्याची काँग्रेस नेत्यांनी वेगळी रणनिती आखली आहे. भाजपचे अस्त्र त्यांच्यावर बुमरँगप्रमाणे उलटविण्यासाठी काँग्रेस हायकमांड सरसावले आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडूराव आणि मंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाजपमध्येच फुट पाडण्याचा इशारा दिला आहे.

बेळगाव जिल्हा राजकारणातील वादामुळे युती सरकारला धक्का पोहोचण्याची भीती निर्माण झाली होती. याचा लाभ उठविण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी ‘ऑपरेशन कमळ’ हाती घेतले आहे. जारकीहोळी बंधुंसह इतर 13 आमदारांना भाजपात आणण्याचा खटाटोप भाजप नेत्यांनी चालविला आहे. दरम्यान, बंडाळीच्या पवित्र्यात असणाऱया जारकीहोळी बंधुंची समजूत काढण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि दिनेश गुंडूराव यांनी प्रयत्न चालविले आहेत.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी बेंगळूरमधील आपल्या निवासस्थानी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा केली. सरकारला धक्का पोहोचेल अशा हालचाली करू नका. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. युती सरकार पाडविण्यासाठी भाजप नेते दिवसा स्वप्न पाहत आहेत. यामुळे त्यांच्या हाती आयतेच कोलित देवू नये, असा कानमंत्रही खर्गे यांनी दिल्याचे समजते.

एकाही आमदाराला हात लावून दाखवा!

भाजप नेत्यांनी एक पान देखील हलवून दाखवावे. आपल्यालाही राजकारण करता येते, असे सांगून मंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाजप नेत्यांना आवाहन दिले आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी बुद्धिबळ खेळ आपल्यालाही खेळता येतो. भाजप नेत्यांनी काँग्रेसमधील एकाही आमदाराला हात लावून दाखवावा. भाजपमधील अनेक आमदार आपल्या संपर्कात आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांनी उर्मटपणा केल्यास भाजपमध्ये फाटाफुट करण्यास आपल्याला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी केला.

कोटस्…

आपण काँग्रेस पक्ष सोडणार नाही. मल्लिकार्जुन खर्गे आपल्याला पित्यासमान असून यांच्या सुचनेचे पालन करू. वाल्मिकी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण जर एकत्र उभे राहणार आहे. या समाजाला मंत्री द्यावे, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे.

– रमेश जारकीहोळी, बेळगाव जिल्हा पालकमंत्री