|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » पाकला नमवून भारत अंतिम फेरीत

पाकला नमवून भारत अंतिम फेरीत 

फुटबॉल : शनिवारी मालदिवविरुद्ध जेतेपदाची लढत

वृत्तसंस्था/ ढाका

मनविर सिंगचे दोन जादुई गोल आणि संधीचा पुरेपूर लाभ उठवत बदली खेळाडू सुमीत पासीने हेडरवर नोंदवलेल्या गोलाच्या बळावर भारताने सॅफ चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा धुव्वा उडवित अंतिम फेरीत स्थान मिळविले. शनिवारी 15 सप्टेंबर रोजी मालदिवविरुद्ध भारताची जेतेपदासाठी लढत होणार आहे.

विद्यमान विजेत्या असणाऱया भारताला मध्यंतरापर्यंत गोल नेदवता आला नव्हता. पण दुसऱया सत्रात 49 व्या मिनिटाला मनविरने गोल नोंदवून भारताचे खाते खोलले आणि 20 मिनिटानंतर त्यानेच त्यात आणखी एका गोलाची भर घातली. बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या सुमीत पासीने 83 व्या मिनिटाला हेडरवर संघाचा तिसरा गोल नोंदवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. पाकचा एकमेव गोल हसन बशिरने 88 व्या मिनिटाला नोंदवला. दुसऱया उपांत्य सामन्यात मालदिवने नेपाळचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरी गाठली.

भारताने पहिला गोल प्रतिआक्रमणात नोंदवला. आशिक कुरुनियानने डाव्या बाजूने वेगात आगेकूच करून मनविरकडे लो क्रॉस पुरविला. त्याने तो आनंदाने स्वीकारत चेंडूला गोलजाळय़ाची अचूक दिशा दिल्यावर भारतीय चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. 68 व्या मिनिटाला निखिल पुजारीच्या जागी आलेल्या लालियानझुआला छांगटेने आपला प्रभाव आल्याबरोबर दाखविला आणि संघाची आघाडी वाढविली. खेळपट्टीच्या मध्यावरून त्याने दोन डिफेंडर्सना हुलकावणी देत आगेकूच केली आणि चेंडू विनित रायकडे पुरविला. त्याने तो मनविरकडे दिला आणि बॉक्स क्षेत्रातून जोरदार फटका लगावत अचूक गोल नोंदवला. पण नंतर प्रशिक्षक कॉन्स्टन्टाईन यांनी मनविरला बदलून त्याच्या जागी सुमीत पासीला मैदानात उतरवले.

त्यानेही आल्या आल्या आपला प्रभाव दाखविला आणि पुढच्याच मिनिटाला म्हणजे 83 व्या मिनिटाला त्याने संघाचा तिसरा गोल नोंदवला. पहिल्या गोलची संधी निर्माण केलेल्या आशिकनेच या गोलची रचना केली. पहिल्या गोलप्रमाणेच यावेळीही त्याने वेगात धाव घेत आगेकूच केली आणि सुमीतच्या दिशेने चेंडू उडविला. त्याने हेडरवर त्याला जाळय़ाची अचूक दिशा देत भारताला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. मात्र मोहसिन अलीवर फाऊल केल्यानंतर छांगटेला पंचांनी बाहेर जाण्याची ऑर्डर दिली. त्याच्याप्रमाणे मोहसिनलाही लाल कार्ड दाखविण्यात आले.

तत्पूर्वी, दहाव्या मिनिटाला भारताला पहिला गोल करण्याची संधी मिळाली होती. पण त्यावेळी आशिकच्या परिपूर्ण क्रॉस पासपर्यंत मनविरला अचूक पोहोचता आले नाही. याशिवाय पाकचा गोलरक्षक युसूफ बटनेही अप्रतिम गोलरक्षण केल्याने भारताच्या काही संधी हुकल्या. अनिरुद्ध थापाच्या कॉर्नरवर सुभाशिष बेसने मारलेली व्हॉली त्याने अप्रतिमरित्या अडवून भारताची ही संधी वाया घालविली. 39 व्या मिनिटाला पाकनेही भारतीय क्षेत्रात आक्रमण करीत 6 यार्ड बॉक्स क्षेत्रात फ्री किक मिळविली होती. पण गोलरक्षक विशाल कायथने लागोपाठ दोनदा अप्रतिम बचाव करीत भारतावरील धोका टाळला होता. यामुळे दोन्ही संघांना गोल नोंदवता न आल्याने पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला होता.