|Saturday, July 20, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिलांचा श्रीलंकेवर 9 गडी राखून विजय

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर 9 गडी राखून विजय 

स्मृती मानधनाचे नाबाद अर्धशतक, मालिकेत 1-0 ने आघाडी, दुसरा सामना आज

वृत्तसंस्था / गॅले

भारतीय महिला संघाने आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान श्रीलंकेवर 9 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रारंभी, श्रीलंकेचा 98 धावांत खुर्दा उडवल्यानंतर भारताने विजयासाठीचे 99 धावांचे आव्हान अवघ्या 19.5 षटकांत एका गडय़ाच्या मोबदल्यात पूर्ण केले. उभय संघातील दुसरा वनडे आज होणार आहे.

यजमान श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधार चमारी जयागानी (33) व श्रीपाली विराकोडी (26) या दोघी वगळता इतर खेळाडूंना भारतीय गोलंदाजासमोर फार काळ तग धरता आला नाही. श्रीलंकेचा डाव 35.1 षटकांत 98 धावांवर आटोपला. मानसी जोशीने सर्वाधिक 16 धावांत 3 गडी बाद केले. पूनम यादव व झूलन गोस्वामीने प्रत्येकी 2 गडी बाद केले. दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड व हेमलता यांनी एकेक गडय़ाला तंबूत पाठवले.

प्रत्युतरातदाखल खेळताना भारताने विजयासाठीचे 99 धावांचे लक्ष्य 19.5 षटकांत एका गडय़ाच्या मोबदल्यात पूर्ण करत शानदार विजय मिळवला. सलामीवीर स्मृती मानधनाने शानदार अर्धशतकी खेळी साकाराताना 76 चेंडूत 11 चौकार व 2 षटकारासह नाबाद 73 धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली. पूनम यादवने 24 धावा फटकावल्या. उभय संघातील दुसरा सामना आज याठिकाणी होईल.

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका 35.1 षटकांत सर्वबाद 98 (जयागानी 33, विराकोडी 26, मानसी जोशी 3/16, झुलन गोस्वामी 2/13, पूनम यादव 2/13).

भारत 19.5 षटकांत 1 बाद 100 (पूनम राऊत 24, स्मृती मानधना नाबाद 73, रणवीरा 1/5).