|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » मालिका पराभवानंतरही भारत कसोटी क्रमवारीत अव्वल

मालिका पराभवानंतरही भारत कसोटी क्रमवारीत अव्वल 

इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवानंतर 10 गुणाचा फटका, इंग्लंडची चौथ्या स्थानी झेप

वृत्तसंस्था/ दुबई

इंग्लंडविरुद्ध 4-1 अशा मानहानीकारक पराभवानंतरही टीम इंडियाने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान कायम राखले आहे. बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय संघ 115 गुणासह अग्रस्थानी असून दक्षिण आफ्रिकन संघ 106 गुणासह दुसऱया तर ऑस्ट्रेलिया तिसऱया स्थानी आहे. याशिवाय, इंग्लिश संघाने एका स्थानाची प्रगती करत चौथे स्थान पटकावले आहे.

इंग्लंड दौऱयावर असलेल्या टीम इंडियाला पाच सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने गमवावी लागली. या मालिका पराभवामुळे भारताचे तब्बल 10 गुण कमी झाले आहेत. ताज्या क्रमवारीत भारताचे 125 वरुन 115 गुण झाले आहेत. दुसऱया स्थानावर असणाऱया दक्षिण आफ्रिकेचे 106 तर ऑस्ट्रेलियाचेही 106 गुण आहेत. यामुळे सध्या तरी भारतीय संघ क्रमवारीत अग्रस्थानी कायम आहे. भारताविरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्याआधी इंग्लंड संघ 97 गुणासह पाचव्या स्थानावर होता. मालिकेत चार विजय मिळवल्याने इंग्लंडच्या खात्यात 8 गुणाची भर पडली असून सध्या ते 105 गुणासह चौथ्या स्थानी विराजमान झाले आहेत. चौथ्या स्थानी असणाऱया न्यूझीलंडची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. न्यूझीलंडचे 102 गुण आहेत. श्रीलंका सहाव्या, पाकिस्तान सातव्या, वेस्ट इंडिज आठव्या, बांगलादेश नवव्या तर झिम्बाब्वे दहाव्या स्थानी आहे.

फलंदाजी क्रमवारीत विराटच अव्वल

इंग्लंड दौऱया यशस्वी ठरलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने फलंदाजी क्रमवारीत अग्रस्थान कायम राखले आहे. विराट 930 गुणासह पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ 929 गुणासह दुसऱया तर न्यूझीलंडचा केन विल्यम्सन 847 गुणासह तिसऱया स्थानी आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानी असून लोकेश राहुल 19 व्या, अजिंक्य रहाणे 22 व्या स्थानावर आहे.

गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसनने 899 गुणासह अग्रस्थान कायम राखले आहे. द.आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा दुसऱया तर फिलँडर तिसऱया स्थानी आहे. भारताचा स्टार फिरकीपटू रविंद्र जडेजा चौथ्या स्थानावर असून रविचंद्रन अश्विनने आठवे स्थान कायम राखले आहे.