|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » क्रिडा » मैत्रिपूर्ण लढतीत इंग्लंडची स्वित्झर्लंडवर मात

मैत्रिपूर्ण लढतीत इंग्लंडची स्वित्झर्लंडवर मात 

वृत्तसंस्था/ लिसेस्टर

स्ट्रायकर मार्कस रॅशफोर्डने दुसऱया सत्रात विजयी गोल केल्यानंतर इंग्लंडने स्वित्झर्लंडविरुद्ध मैत्रिपूर्ण लढतीत 1-0 असा विजय संपादन केला. या निकालासह त्यांनी सलग चौथा पराभव देखील टाळला, ते त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरले. 54 व्या मिनिटाला रॅशफोर्डने गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. इंग्लंडतर्फे रॅशफोर्डचा हा 27 सामन्यातील पाचवा गोल ठरला आणि मागील 4 दिवसातील चक्क दुसरा गोलही ठरला. यापूर्वी शनिवारी वेम्बले येथे स्पेनविरुद्ध नेशन्स लीग स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला, त्यावेळी त्यात देखील रॅशफोर्डने गोल केला होता. 

विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱया इंग्लंडने या लढतीत चक्क 9 बदल केले होते. मेरिलँडमध्ये झालेल्या अन्य लढतीत ब्राझीलने अल साल्वाडोरचा 5-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला. ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे यांनी यावेळी संघाचा चेहरामोहराच बदलला होता. गोलरक्षक नेटो, फुलबॅक इडेल मिलिताओ, सेंटर फॉरवर्ड रिचार्लीसन, मिडफिल्डमध्ये ऑर्थर यांना त्यांनी संधी दिली. सामन्याच्या अवघ्या तिसऱया मिनिटालाच नेमारने ब्राझीलचे खाते उघडले तर रिचार्लीसनने 13 मिनिटांच्या अंतराने दुसरा गोल केला. त्याने 15 मीटर्स अंतरावरुन गोलजाळय़ाचा वेध घेतला. फिलीप कॉटिन्होने देखील गोल करत आघाडी भक्कम केली. रिचार्लीसनने पुढे वैयक्तिक दुसरा गोल केला तर मॉर्क्विन्होजने शेवटच्या मिनिटाला संघाचा पाचवा गोल नोंदवला. कॉर्नरवरुन नेमारच्या पासवर त्याने हेडरवर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला होता.

अन्य लढतीत अमेरिकेने मेक्सिकोला 1-0 अशा फरकाने पराभूत केले. नॅशव्हिले येथे झालेल्या या सामन्यात 19 वर्षीय टेलर ऍडम्सने एकमेव गोल केला. मेक्सिकोच्या झॅल्दिव्हरला विल ट्रपला धोकादायकरित्या पाडवल्याबद्दल थेट रेड कार्ड दिले गेले. न्यू जर्सी येथील अर्जेन्टिना-कोलंबिया यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत राहिली. कोलंबियन गोलरक्षक डेव्हिड ओस्पिनाचे अप्रतिम गोलरक्षण या लढतीचे ठळक वैशिष्टय़ ठरले. अर्जेन्टिनाचा संघ लायोनेल मेस्सीच्या गैरहजेरीत युवा खेळाडूंना पसंती दिली होती. त्या तुलनेत कोलंबियाचा संघ बराच अनुभवी होता.