|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » सरदार सिंग आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त

सरदार सिंग आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त 

23 सदस्यांच्या प्रशिक्षण शिबिरातून वगळल्यानंतर दुसऱयाच दिवशी घोषणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

माजी भारतीय कर्णधार सरदार सिंगने बुधवारी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली. ‘मागील 12 वर्षात आपण बरेच खेळत आलो असून आता नवोदित, युवा खेळाडूंनी आपली जागा घेण्याची वेळ आली आहे’, असे प्रतिपादन त्याने याप्रसंगी केले. ‘आशियाई स्पर्धेत भारताला जेतेपद कायम राखता आले नाही व फक्त कांस्यपदकासह परतावे लागले. त्याचवेळी मी निवृत्तीचा विचार केला’, याचा त्याने उल्लेख केला. यापूर्वी वय व वेग या दोन्ही आघाडय़ांवर अपेक्षित साथ मिळत नसताना सरदार सिंग आशियाई स्पर्धेत बराच झगडला होता. शिवाय, यामुळे तो सातत्याने टीकेचे लक्ष्यही ठरत आला. त्या पार्श्वभूमीवर त्याने पायउतार होणे पसंत केले.

‘चंदिगडमधील माझ्या कुटुंबियांशी मी चर्चा केली. हॉकी इंडिया व माझ्या मित्रांची मते आजमावली आणि निवृत्तीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे मला जाणवले. त्यामुळे, मी हा निर्णय घेत आहे. वास्तविक, मी आणखी बरेच खेळू शकलो असतो. 2020 टोकियो ऑलिम्पिक खेळण्याचीही माझी इच्छा होती. पण, त्या इच्छेला मुरड घालावी लागली’, असे या अनुभवी माजी कर्णधाराने पुढे नमूद केले.

हॉकी इंडियाने बुधवारी 25 सदस्यीय कोअर संघाची प्रशिक्षण शिबिरासाठी घोषणा केली, त्यात सरदारचा समावेश नव्हता. प्रशिक्षण शिबिरातून वगळल्याबद्दल त्यावर प्रतिक्रिया विचारली असता सरदार सिंगने थेट बोलणे वा प्रतिक्रिया देणे टाळले आणि शुक्रवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत आपण निवृत्तीची औपचारिक माहिती देणार आहोत, असे नमूद केले.

सरदार सिंगने 2006 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघातर्फे वरिष्ठ स्तरावर पदार्पण नोंदवले. त्यानंतर 12 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने संघासाठी मध्यफळीत मोलाचे योगदान दिले. 32 वर्षीय सरदार सिंगने भारतातर्फे 350 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 2008 ते 2016 या तब्बल 8 वर्षांच्या कालावधीत त्याने संघाचे नेतृत्वही सांभाळले. 2016 नंतर नेतृत्वाची धुरा पीआर श्रीजेशकडे सोपवली गेली.

2008 मध्ये सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व हाताळले, त्यावेळी तो भारताचा सर्वात युवा कर्णधार देखील ठरला. या दिग्गज अनुभवी खेळाडूला 2012 मध्ये अर्जुन पुरस्कार तर 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले. सरदार सिंगने दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही संघाचे प्रतिनिधीत्व केले. वास्तविक, या दिग्गज खेळाडूला विविध कारणामुळे गोल्डकेस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळले गेले होते. पण, त्याने नंतर खडतर परिश्रम घेत आपले तंत्र सुधारले आणि संघात जोरदार पुनरागमन केले. त्याने चॅम्पियन्स चषक स्पर्धेत पुनरागमन करताना भारताला रौप्य मिळवून देण्यातही सिंहाचा वाटा उचलला. अर्थात, अलीकडील कालावधीत वाढत्या वयाच्या खुणा त्याच्या खेळावर दिसून आल्या. त्याचा खेळ मंदावला. पण, आताही त्यालाच भारतीय संघातील तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक मानले जात होते.

‘माझ्या निवृत्तीमागे तंदुरुस्तीच्या समस्येचे कारण नाही. मी आणखी बरीच वर्षे खेळत राहू शकतो. पण, प्रत्येक खेळाडूला निवृत्तीचा निर्णय घ्यावाच लागतो आणि मी ही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. मी माझा निर्णय मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनाही कळवला आहे’, असे सरदार याप्रसंगी पुढे म्हणाला. हरियाणातील सिरसा येथील मूळ असलेल्या सरदारची कारकीर्द बऱयाच कारणांनी वादग्रस्त देखील ठरली. भारतीय वंशाच्या ब्रिटीश महिलेने त्याच्यावर बलात्काराचा ठपका ठेवला तर सरदारने त्याचा स्पष्टपणे इन्कार केला. याप्रकरणी नंतर त्याला लुधियाना पोलिसांच्या खास चौकशी समितीने क्लीन चीट दिली होती.