|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » न्याय हक्कासाठी प्राध्यापकांनी केले रजा आंदोलन

न्याय हक्कासाठी प्राध्यापकांनी केले रजा आंदोलन 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

राज्यभरातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा कायमस्वरूपी व नियमित वेतनश्रेणीवर त्वरीत भराव्या, 2005 नंतरची नवीन पेन्शन योजना रद्द करून, जुनी पेन्शन योजना लागू करा, सातवा वेतन आयोग लागू करा, यासह अन्य मागण्यांसाठी सुटा (शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ)संघटनेतर्फे एक दिवस सामुदायिक नैमित्तिक रजेवर जावून रजा आंदोलन करण्यात आले. तसेच शिवाजी विद्यापीठात शासनाच्या विरोधात निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला.

निवेदनात म्हंटले आहे, राज्यातील प्राध्यापकांचे 71 दिवसांचे प्रलंबित वेतन त्वरीत अदा करावे. शिक्षक (ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक आदींसह)सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी केंद्राने 100 टक्के नुदान द्यावे. सीएचबी प्राध्यापकांना समान कामाला समान वेतन द्यावे. विनाअनुदानित महाविद्यलयातील सर्व शिक्षकांना त्यांच्या व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्ण वेतन द्यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण संस्थांनी समान काम समान वेतन या तत्वाची अम्मलबजावणी करावी. शासनाने सेवेत रूजू झाल्यावर नियमित प्राध्यापकांना ठरवून दिलेल्या मासिक वेतनाप्रमाणे कंत्राटी प्राध्यापकांनाही वेतन द्यावे. 2 अथवा 3 निवृत्त अथवा कार्यरत असलेल्या विद्यापीठ व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाच्या न्यायाधीशांची तक्रार निवारण समिती त्वरीत गठीत करावी. सहाव्या वेतन आयोगातील शिफालशींची अम्मलबजावणी करताना निर्माण झालेल्या त्रुटींची दुरूस्ती तत्काळ करण्यात यावी. यु. जी.सी.च्या नियमाप्रमाणे सर्व शिक्षकांना त्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून द्यावे. राज्यातील विद्यापीठांची लोकशाही कार्यप्रणाली सुरक्षित करण्यासाठी विविध प्राधिकरणांवर नामनियुक्त केल्या जाणाऱया सदस्यांची संख्या कमी करण्याबाबत वटहुकुम शासनाने त्वरीत जारी करावा. उच्च शिक्षण संचालक व सहसंचालक यांच्या कार्यालयीन कार्यप्रणालीतील एकाधिकारशाही संपुष्टात आणावी.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. एच. पाटील, कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील, डॉ. एच. आर. पाटील, कार्यवाह प्रा. यु. ए. वाघमारे,डॉ. ईला जोगी,डॉ. अरूण पाटील, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. आर. के. चव्हाण, डॉ. सुभाष जाधव, प्रा. युवराज पाटील, डॉ. एस. ए. पवार, यांच्यासह प्राध्यापक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.