|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » युवकांना सक्षम बनवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही

युवकांना सक्षम बनवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

युवकांना सक्षम बनविण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ही शिकवण फुले, शाहू, आंबेडकरांनी समाजाला दिली. तोच विचार जोपासण्याचे काम जयसिंगपूर महाविद्यालय करीत आहे. ही समाधानाची बाब आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता ते प्रशिक्षण देण्याचे विविध उपक्रम महाविद्यालयात राबविले जात आहे हे अत्यंत स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी काढले.

जयसिंगपूर कॉलेजमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुदानातून बांधण्यात आलेल्या इनडोअर स्टेडियमचे छत्रपती शाहू महाराज स्टेडियम असे नामकरण व महात्मा फुले शेतकरी संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारत भूमीपूजन प्रसंगी श्रीमंत शाहू महाराज उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते.

श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, शेतकऱयांच्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी जयसिंगपूर नगरीची स्थापना केली. तर चळवळीच्या माध्यमातून शेतकऱयांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचे काम खासदार राजू शेट्टी यांनी केले. त्याबद्दल त्यांचेही कौतुक त्यांनी केले. ज्याठिकाणी शेतकरी व विद्यार्थ्यांच्या विकासाचा उपक्रम राबविला जाईल, त्याठिकाणी राजर्षि शाहूंप्रमाणे माझेही सहकार्य रा†िहल, असेही ते म्हणाले.

खासदार राजू शेट्टी म्हणाले, मन, मनगट आणि मेंदूतून सक्षम विद्यार्थ्यांबरोबर आपल्याला सुसंस्कारीत पिढीदेखील घडविणे गरजेचे आहे. भविष्यात अन्न प्रक्रिया उद्योगाची मोठी गरज भासणार असून स्वयंरोजगार मिळवून देणारा फूड सायन्स विभागही महाविद्यालयाने सुरू केला ही चांगली बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा फुले कृषि संशोधन केंद्रात शेतकऱयांबरोबर विद्यार्थ्यांनीही अभ्यास करावा. हे महाविद्यालय म्हणजे केवळ पदवीधर बनविण्याचा नव्हे तर संशोधक निर्माण करणारे, विविध सामाजिक उपक्रम राबविणारे व संस्कारक्षम विद्यार्थी निर्माण करणारा कारखाना आहे, हे दाखवून देवूया. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष गौतम पाटील म्हणाले, आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही खेळाडू विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात याकरिता प्रयत्नशील आहोत. विद्यापीठात नसलेल्या सुविधा जयसिंगपूर कॉलेजने निर्माण केल्या आहेत. त्यामुळे येणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेत येथील एक तरी खेळाडू जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

नगराध्यक्षा डॉ. निता माने, माजी प्राचार्य बी. एम. राठोर यांनी मनोगते व्यक्त केली. स्थानिक स्कूल कमिटीचे सचिव डॉ. सुभाष आडदांडे, डॉ. महावीर अक्कोळे यांच्यासह मान्यवर, विद्यार्थी व नाग†िरक उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांनी केले. आभार स्थानिक समिती अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी मानले.