|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » खा.संजयकाका पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

खा.संजयकाका पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा 

प्रतिनिधी / सांगली

 कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खा. संजयकाका पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील पाणी योजनांच्या पुर्णत्वासाठी यापुढे आपले प्राधान्य असेल, अशी ग्वाही खा. पाटील यांनी तरूण भारतशी बोलताना दिली.

 गेल्या तीन चार वर्षापासून खासदार म्हणून आणि त्यापूर्वी आमदार असताना संजयकाका पाटील यांनी पाणी योजनांबाबत सखोल अभ्यास केला आहे. या योजना पूर्ण करण्यासाठी शासनाच्या पातळीवर तसेच ग्राऊंडवरही प्रशासनाशी पाठपुरावा करून योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांची पाणी योजना पूर्ण करण्यासाठी असणारी तळमळ आणि सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मोठय़ा प्रमाणात खेचून आणलेला निधी यातून त्यांनी आपली धडाडी दाखवली होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कृष्णा खोरे विकास महामंडळाची जबाबदारी टाकली. ही जबाबदारी आणखी सक्षमपणे सांभाळण्यासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असतानाच त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर मोठा विश्वास टाकला आहे. त्यामुळे आपली जबाबदारीही वाढली असल्याचे सांगत सांगली जिह्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजनांना गती देण्याचे काम आपण प्राधान्याने करणार असल्याची प्रतिक्रिया खा. पाटील यांनी तरूण भारतशी बोलताना दिली.