|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’

‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’ 

प्रतिनिधी/ विटा

गणेशोत्सव काळात सामाजिक सलोखा राखा, डॉल्बी आणि गुलालमुक्त पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा. गेल्या काही वर्षापासून आपण गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे. त्यानुसार यावर्षी आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवा आणि सामाजिक सुरक्षिततेला प्राधान्य द्या, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी केले.

येथील जय मल्टिपर्पज हॉल येथे गणेशोत्सव आणि मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक बोराटे बोलत होते. प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, नगरसेवक अमोल बाबर, मुख्याधिकारी महेश रोकडे, देवदत्त राजोपाध्ये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अप्पर पोलीस अधीक्षक बोराटे म्हणाले, एकीकडे पारंपरिक वाद्ये दुर्मिळ होत चालली आहेत. त्याचवेळी डॉल्बीसारखी ध्वनी प्रदूषण करणाऱया यंत्रणा कार्यरत आहेत. त्याचा त्रास आपल्याच परिसरातील लोकांना होत असतो. वास्तविक पाहता सामाजिक सलोखा राहावा, प्रबोधन व्हावे, ही सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागे भावना होती. परंतु डॉल्बी मिरवणुका, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठय़ा मुर्ती, त्यासाठी वापरले जाणारे रासायनिक रंग यामुळे आपण मुळ उद्देशापासून दूर जात आहोत.

एका गावात एकच गणेशोत्सव असावा. त्यातून सगळ्या गावाने एकत्र यावे आणि राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागावी, हा मूळ उद्देश आहे. परंतु बदलत्या काळात आपण या उद्देशापासून दूर जात आहोत. गेल्या तीन चार वर्षांपासून आपण जलसंधारणासारख्या कामांना निधी गोळा केला. याची दाखल मुख्यमंत्र्यांनी घेतला.r यावर्षी आपण सर्व गणेश मंडळांना सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक मंडळाने किमान दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, यातून आपल्याच माय बहिणींची सुरक्षितता जपली जाईल, असेही बोराटे यांनी यावेळी सांगितले.

माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, गणेशोत्सव काळात आरोग्य, रस्ते, सुविधा देण्याबाबत कार्यवाही केली जाईल. शहरासह तालुक्यात सामाजिक सलोखा नेहमीच राखला जातो. केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याची भूमिका गणेश मंडळांनी घ्यावी, असे आवाहन माजी नगराध्यक्ष पाटील यांनी केले.

नगरसेवक अमोल बाबर म्हणाले, खानापूर तालुक्यात नेहमीच सर्वसमावेशक गणेशोत्सव साजरा केला जातो. खेडेगावातून जी छोटी छोटी मंडळे गणपती बसवीत आहेत. त्यांना प्रशासनाने परवाने, विविध परवानग्या बाबतीत सहकार्य करावे. रात्रीच्या वेळी नियमांच्या बाबतीत प्रशासनाने सहकार्य करावे. तालुक्यात अधिकाधीक गणेश मंडळांनी उत्सव साजरा करावा आणि त्यातून एकजूट व्हावी, ही आपली भूमिका आहे.

प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, देवदत्त राजोपाध्ये, राजू मुल्ला, निशांत धनावडे,  महम्मद मुल्ला, मंजिरी गुळवणी, राजकुमार यादव यांनी मनोगत व्यक्त केले.  स्वागत उपविभागीय अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांनी केले तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ यांनी मानले.