|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » रात्री 9.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकाऱयांच्या केबीनमध्ये बैठक; कार्यकर्त्यांची परखड भूमिका

रात्री 9.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकाऱयांच्या केबीनमध्ये बैठक; कार्यकर्त्यांची परखड भूमिका 

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील गणेशमूर्ती विसर्जनाचा जटील झालेल्या प्रश्नावर रात्री उशीरापर्यंत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत घरगुती गणेशमूर्ती विसर्जन तिढा सुटल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी गोडोली तळय़ातच विसर्जन करण्याबाबत आडमुठी भूमिका घेतली, तर काही कार्यकर्त्यांनी गोडोली तळय़ातील विसर्जनावर जोरदार विरोध दर्शवला.

सातारा शहरातील गणेशोत्सवानंतर विसर्जनाच्या मुद्यावरुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी रात्री उशीरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात मोजक्याच अधिकाऱयांसमवेत मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत विविध मुद्यांवर ऊहापोह झाला. शेखर मोरे पाटील यांनी गोडोली तळय़ात विसर्जन केल्याने होणारे तोटे सांगितले. तर अशोक घोरपडे यांनी शासनाने फक्त निर्देश द्यावेत, आम्ही मदत करायला तयार आहे. आम्ही गणेशभक्त आहोत, मोठी मूर्ती गतवर्षी विसर्जित केली नाही.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पोलीस प्रशासनाकडून जर कोठे भेदभाव होत असले तर तो निदर्शनास आणून द्यावे, असे सांगितले. घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पाच तळय़ांची निश्चिती करण्यात आली. ती म्हणजे गोडोली तळे, कल्याणी शाळा तळे, दगडी शाळा तळे, हुतात्मा स्मारक कृत्रिम तलाव, पालिकेचा पोहण्याचा तलाव. तर चर्चेदरम्यान, जिल्हाधिकाऱयांनी पालिका प्रशासनास खडसावत हुतात्मा स्मारक येथील कृत्रिम तळय़ाची लांबीरुंदी वाढवा, जेणेकरुन कायमची डोकेदुखी कमी होईल, अशा सूचना दिल्या.

अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण?

तसेच कण्हेर येथील दगडी खाणीतील तळय़ात विसर्जन करताना जर अनुचित प्रकार घडल्यास त्यास कोण जबाबदार? असाही प्रश्न यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. मात्र, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घरगुती गणेशमूर्ती विसर्जन तिढा सुटल्याचे सांगण्यात आले आहे.