|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जपा भक्तीभाव, नको डिजेचा थरथराट

जपा भक्तीभाव, नको डिजेचा थरथराट 

चंद्रकांत देवरुखकर/ सातारा

डॉल्बीच्या प्रचंड दणदणाटाचे आवाज प्रदुषणासह सामाजिक, व्यक्तीगत परिणाम समोर आल्यानंतर त्यावर दाखल झालेल्या जनहित याचिकांवर निकाल देताना उच्च न्यायालयाने डॉल्बीवर बंदी आणली आहे. ही बंदी सर्वांसाठीच आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा आदर प्रत्येकाने ठेवला पाहिजे, अशी भावना व्यक्त करत सातारकरांनी पोलिसांच्या डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, याच विषयावर खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडलेली भूमिका तरुणाईला आवडणारी असली तरी पोलिसांच्या सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्थेच्या भूमिकेनुसार जपा भक्तीभाव, नको डॉल्बीचा थरथराट अशाच भावना सूज्ञ सातारकरांनी व्यक्त केल्या आहेत.

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव
परंपरा कायम रहावी

गेल्या तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिह्यांत राबविण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने केला आहे. त्यासाठी येथून पुढे कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये डॉल्बी लावल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

त्यावर व्यक्त होताना खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या स्टाईलने डॉल्बीचे समर्थन करत गणेशोत्सवात डॉल्बी वाजणार असे भावनिक वक्तव्य केले आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे विरुध्द पोलीस प्रशासन असे चित्र रंगवले जात आहे. मात्र, शांतताप्रिय सातारकरांना डॉल्बीमुक्तच गणेशोत्सव हवा आहे याकडे जबाबदारीचे भान असलेल्या खासदार उदयनराजे यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी गणेशोत्सवात डॉल्बीचे कोणते चांगले परिणाम समाजासमोर आले आहेत असाही नागरिकांचा सवाल आहे.

नोटिसा पाठवून जनजागृती

डॉल्बीचे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. त्याचा वापर करू नये यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या जिह्यांतील सर्व सार्वजनिक तरुण मंडळांच्या अध्यक्षांना नोटिसा पाठवून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच डॉल्बी वापरासंबंधी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व सार्वजनिक तरुण मंडळांची विशेष बैठक बोलाविण्याचे आदेशही पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

गतवर्षी नियमबाह्य डॉल्बी लावणारी सार्वजनिक मंडळे यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर राहावे लागत आहे. मंडळातील बहुतांशी कार्यकर्ते हे तरुण आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचे शैक्षणिक करिअर संपुष्टात येते. त्यामुळे त्यांची व कुटुंबाची मोठी हानी होते. या गोष्टीचा विचार करून तरुणांनी डॉल्बीपासून लांब राहून गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. एकुणच चार वर्षापूर्वी झालेल्या घटनेमुळे शहरातील मिरवणुका डॉल्बी विरहित झाल्या, अशाच पुढे व्हाव्यात हीच सातारकरांची अपेक्षा आहे.

सामाजिक बांधिलकीची जाणीव आवश्यक !

गणेशोत्सव हा भक्तीभावाचे व सामजिक प्रबोधनाचे प्रतिक आहे. गणेशोत्सवात विविध अनिष्ठ नष्ठ होण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखावे सादर करतात म्हणजेच गणेश मंडळांना सामाजिक बांधिलकीची जाणीव असते. तीच सामाजिक बांधिलकीची ध्वनी प्रदुषणाबाबत दाखवण्याची गरज आहे. त्यासाठी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना कृतीशीलपणे राबवावी. या डॉल्बीमुळे अनेक भयानक घटना घडल्या आहेत. अशा पुन्हा होवू नयेत. गणेशोत्सवातील भक्तीभाव जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, अशाही भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.