|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » 30 वर्षानंतर झोपडीत पडला उजेड

30 वर्षानंतर झोपडीत पडला उजेड 

सरकारी योजनेतून गणेश चतुर्थीच्या शुभमुर्हुतावर वीज जोडणी

प्रतिनिधी / सांखळी

सांखळीतील भामईवाडा येथील गोकुळ बेतकीकर या 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या झोपडीत तब्बल 30 वर्षानंतर म्हणजे बुधवार दि. 12 रोजी कृत्रिम उजेड पडला आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहुर्तावर वीज जोडणी मिळाल्याने तिची झोपडी प्रकाशमय झाली आहे. उशिर का होईना घरात वीज आल्याने तिने सरकारचे आभार मानले.

गोकुळ बेतकीकर ही एकटीच या झोपडीत राहाते. कॅरोसिनचा दिवा लावून तिने गेली 30 वर्षे घालविली मात्र आता कॅरोसिन उपलब्ध होत नसल्याने तिच्या समोर मोठे संकट उभे ठाकले होते. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या सहकार्याने तिने एका सरकारी योजनेचा फायदा मिळविला. या संबंधित अधिकाऱयांनीही तिला चांगले सहकार्य केले. स्थानिक पंचायत सदस्या अनिता कुंडईकर यांनीही योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. या योजनेद्वारे गोकुळ बेतकीकरच्या झोपडीला वीज जोडणी मिळाली व बल्बद्वारे झोपडी प्रकाशमय झाली.

सरकारी योजना मिळवून दिल्या पाहिजेत : सरपंच

भाजप सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. त्याचा लाभ अनेकजण घेत आहेत. मात्र काही गरीब व कष्टकरी लोकांपर्यंत या योजना पोहोचत नाहीत. त्यांना योजना मिळवून देणे गरजेचे असते. अशा योजना सर्वांपर्यंत पोहोचवणाराच खरा सामाजिक कार्यकर्ता असतो. एका गरीब वृद्ध महिलेला गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर वीज मिळणे तिच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असल्याचे सरपंच सुभाष फोंडेकर यांनी सांगितले.