|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गणरायाच्या स्वागतासाठी सत्तरी तालुका सज्ज

गणरायाच्या स्वागतासाठी सत्तरी तालुका सज्ज 

प्रतिनिधी/ वाळपई

गोमंतकीय जनतेचा प्रिय सण म्हणून गणल्या जाणाऱया गणेश चतुर्थी उत्सवाच्या तयारीला सर्वच पातळीवरून वेग आलेला आहे. बाजारपेठांमधील सर्व दुकाने गणेश चतुर्थीला लागणाऱया विविध प्रकारच्या सामानाने सजलेले आहेत. खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढू लागली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. शहरामध्ये एक सार्वजनिक गणपती तर वाळपई पोलीसस्थानक व पोलीस प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश आहे.

गणेश चतुर्थीच्या काळात गोव्यात सर्वत्र उत्साही व भक्तीमय वातावरण असते. लहान मुलांमध्ये तर गणेशाच्या आगमनाची आतुरता दिसून येते. गेल्या चार दिवसांपासून बाजारामध्ये गर्दी वाढली असली तरी बुधवारी माटोळीच्या सामानाची खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली होती. वाळपई शहरातील फामिमा कॉन्व्हेंट परिसरातून जाणाऱया संपूर्ण रस्त्यावर माटोळीचे सामान विक्रीसाठी उपलब्ध आहे. काही प्रमाणात महागाईचे चटके असतानाही गणेशभक्तांचा आनंद अजिबात दुरावलेला नाही. निसर्गाच्या उपासनेचा संदेश देणाऱया गणेशोत्सवात जंगलातील पावसाळय़ात सापडणारी विविध फळे, फुले व पानांचा आविष्कार घराघरात माटोळीच्या स्वरुपात दिसून येतो. माटोळीसाठी लागणारे सामानाने बाजारपेठ पूर्ण भरून गेली आहे.

गेल्या चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने व्यापारीवर्गाची चांगली सोय झाली. शिवाय ग्राहकांनाही खरेदी व फिरण्यासाठी सोयीस्कर झाले आहे. मात्र माटोळीसाठी विक्रीसाठी आणलेले साहित्य कडक उन्हामध्ये कोमेजले होते. माटोळीसाठी वापरले जाणारे पेरू, चिकू, वांगी, अंबाडे, चिबूड, दुधी भोपळा, तोरिंग, केळी, नारळाची पेंड, सुपारीची शिपटे, नीरफणस, फणस, पडवळ, लिंबू, कारली, काडी, भाजीची केळी, तसेच कांगला, कातरा, पत्रेफळ, माळंगा, उमळीफळ, आटकेफळ, दिपकीफळ, कुमडळा, ताबलेफळ, माट्टिकात्रे, भिल्लफळ अशी फळे विक्रीसाठी आलेली  आहेत. गौरीसाठी लागणाऱया वनस्पती, दुर्वा, बेल, तुळस, केळीची पाने विडय़ाची पाने, हळदीची पाने, अळू तसेच कोकमची सोले, अंटबाची सोले, उकडे तांदूळ, नाचणी तांदाळचे पीठ व काजू लाडू, करंज्या, शंकरपाळी, चिवडा, मोदक आदी जिन्नस विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. सत्तरी तालुक्यामध्ये बहुतेक गावांमध्ये पाच दिवस तर काही गावांमध्ये दीड दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. काही गावांमध्ये गौरीपूजन पाचव्या दिवशी केले जाते तर काही ठिकाणी मुहुर्तावर गौरीपूजन केले जाते.

महागाईचा खरेदीवर फटका

दिवसेंदिवस वाढणाऱया महागाईची झळ बाजारपेठेला पोहोचली आहे. अनेक भक्तांना महागाईचा फटका बसला असून खरेदीवरही विपरित परिणाम झाल्याचे अनेक विक्रेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील वेगवेगळय़ा संस्थांमध्ये गणेशभक्तांची खरेदीसाठी गर्दी दिसत असली तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेला महागाईची झळ जाणवल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. याबाबत सत्तरी तालुका शेतकरी सहकारी संस्था चालवीत असलेल्या सत्तरी बाजार व स्वयंसेवी भांडाराचे कार्यकारी संचालक सुरेश गावकर यांनी सांगितले की वेगवेगळे धान्य यात बऱयाच प्रमाणात दरामध्ये वाढ झाल्याने याचा फटका गणेशभक्तांच्या खरेदीवर झालेला आहे. सत्तरी अपना बाजारतर्फे दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीच्या कालावधीत खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे. दोन हजार रुपयांच्या खरेदीवर एक किलो उच्च दर्जाची साखर मोफत देण्याची योजना एक सप्टेंबरपासून जाहीर करण्यात आली आहे. गोवा बागायतदार संस्थेच्या वाळपई शाखेतही अशाच प्रकारची ऑफर अनुभवायला मिळाली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. बागायतदारमध्ये वेगवेगळय़ा वस्तूंच्या खरेदीसाठी भर देण्यात येते. वाळपईतील युवा उद्योजक धर्मेश साळुंखे यांनीही यंदा विक्रीमध्ये बऱयाच प्रमाणात घसरण झाल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने यात आणखी भर पडली. याचा परिणाम गणेशभक्तांच्या भ्रमंतीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुरक्षितता पाळण्याचे आवाहन

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सरकारच्या सुरक्षितता मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी केले आहे. पोलीस खात्यातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करीत असताना वेगवेगळय़ा प्रकारच्या सुरक्षातत्वांची अंमलबजावणी व्हावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही.

श्री. वायंगणकर यांनी सांगितले की तालुक्यामध्ये वाळपई, ठाणे व केरी या तीन ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यक्रम होत असतात. अकरा दिवसांच्या या गणेशोत्सवात या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शांतता भंग होणार नाही याची दखल घेणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती पूजनाच्या ठिकाणी व अवतीभेवती सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. याबाबत सर्व मंडळांना कागदोपत्री सोपस्कार पाठविण्यात आले आहेत, त्याचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सव तसेच तालुक्याच्या प्रमुख ठिकाणावर बंदोबस्त करण्यात येणार असून सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.