|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मंगलमूर्ती आले घरा !

मंगलमूर्ती आले घरा ! 

बाप्पा मोरयाचा गजर सुरू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही सज्ज !

 

प्रतिनिधी/ पणजी

विघ्नहर्त्यां गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा संपली असून आज घरोघरी मंगलमूर्तीचे आगमन होत आहे. समस्त गोमंतकीय चतुर्थीच्या उत्साहात न्हाऊन निघाले असून मंगलमयी वातावरण गोव्यात निर्माण झाले आहे. आनंदी आनंद सर्वत्र पसरला असून गणेशभक्त चतुर्थीच्या उत्सवात उत्साहात दंग झाले आहेत.

राज्यात चतुर्थीचा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. दरवर्षी गोमंतकीय लोक चतुर्थीच्या आगमनाची मोठय़ा आतुरतेने वाट पाहतात. अन्य सणांच्या मानाने गोव्यात चतुर्थी सण मोठा मानला जातो. त्यामुळे चतुर्थीची तयारी गोव्यात महिनाभर अगोदरच सुरु होते. समस्त गोमंतकीय चतुर्थीचा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करतात.

आज मंगलमूर्ती गणरायाचे घरोघरी आगमन होत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणीही गणरायाचे आगमन होत आहे. आजपासून राज्यात चतुर्थीला सुरुवात झाली आहे.

सडा रांगोळ्यानी सजलेल्या घरामध्ये आज गणरायाचे आगमन सकाळीच होत आहे. त्यामुळे साखरझोप विसरुन पहाटेच आज संपूर्ण गोवा जागा झाला व पहाटेच मंगलमयी सुरांनी वातावरण सजले आणि या मंगलमयी वातावरणात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. राज्यात दीड दिवसापासून पाच, सात, नऊ, अकरा दिवसपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा असतो.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे दर्जेदार कार्यक्रम

गणेशोत्सव काळात भजन, कीर्तन यासह अन्य दर्जेदार कार्यक्रम पुढील अकरा दिवसपर्यंत चालणार आहे. सार्वजनिक मंडळामधून दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पुणे, मुंबईतील राष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचबरोबर दर्जेदार नाटकांचेही सादरीकरण केले जाते. स्थानिक भजनी कलाकारांच्या मैफली तर सुरुच असतात. त्याचबरोबर घुमट आरती पथकांचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. विविध प्रकारच्या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवामुळे पुढील दहा दिवस राज्यात आनंदी सोहळा चालणार आहे.