|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बार्शी शहर पोलीस ठाण्यासमोर पोलिसांना जमावाची मारहाण

बार्शी शहर पोलीस ठाण्यासमोर पोलिसांना जमावाची मारहाण 

प्रतिनिधी/ बार्शी 

गणेश उत्सवामध्ये जिल्हाधिकाऱयांनी जमावबंदी आदेश लागू केलेले असताना बार्शी शहर पोलीस ठाण्यासमोर जमाव गोळा करून पोलिसांशी हुज्जत घालत पोलीस उपनिरीक्षकासह एका पोलिसांस मारहाण करून जखमी केले असून पोलिसांनी बळाचा वापर करीत 19 जणांना अटक केली. संबंधिताना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने जामीन फेटाळला असून सर्वजणांची रवानगी सोलापूर कारागृहात करण्यात आली आहे.

मारहाणीमध्ये जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक शिवाजी विभूते यांनी फिर्याद दाखल केली असून राजेंद्र जाधव, नागनाथ पवार, विजय कानगूडे, हनुमंत वाणी, सागर पवार, राकेश वाणी, सत्यवान कानगुडे, संजय हांडे, शिवशंकर ढवण, संतोष गावसाने, विकास जाधव, आकाश कानगुडे, सुरज कसाब, समाधान देवकर, दत्ता जाधव, परमेश्वर कानगुडे, किशोर कानगुडे, नारायण गोकळे, नितीन पेटाडे, (सर्व रा. सौंदरे ता. बार्शी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बार्शी शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान वरील सर्व जमाव घेऊन आले व पोलिसांना सांगत होते की, आमची पोस्ट चौकात हाणामारी झाली असून मारहाण केलेल्यांना तात्काळ अटक करा. त्यावेळी पोलिसांनी ज्यांना मारहाण झाली त्यांनी थांबून तक्रार दय़ावी. बाकी सर्वजणांनी बाहेर जावे, असे सांगितले. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर बसस्थानक चौकांत थांबून जमावाने गोंधळ सुरू केला. यावेळी पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचेसह, पोलीस उपनिरीक्षक, सात ते आठ पोलीस कर्मचारी त्यांना समज देण्यास गेले.

याचवेळी जमावातील काहीजणांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी विभूते यांना धक्का-बुक्की करून मारहाण केली. यावेळी त्यांची वर्दीवर असणारी नंबरप्लेट तुटली तसेच पोलीस कर्मचारी बोबडे व नकाशे यांनाही जमावाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. विभूते यांना छातीवर तसेच मानेवर जखम झाली असून त्यांचेवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी गणेश उत्सवासाठी मागवण्यात आलेली जादा कुमक बोलावून बळाचा वापर करून 19 जणांना अटक केली. शासकीय कामात अडथळा, सार्वजनिक ठिकाणी जमाव गोळा करून गोंधळ घालणे, शासकीय कर्मचाऱयांना मारहाण करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी न्यायालयात न्यायदंडाधिकारी एस. के. खान यांचेसमोर 19 जणांना अटक करून उभे केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सर्वजणांनी न्यायालयाकडे जामीन अर्ज केला पण जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने सर्वांची सोलापूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप जोरे करीत आहेत.