|Friday, July 19, 2019
You are here: Home » विविधा » हिंदू-मुस्लिम गणेशभक्तांच्या सद्भावना रॅलीतून अपंग सैनिकांच्या कार्याला सलाम

हिंदू-मुस्लिम गणेशभक्तांच्या सद्भावना रॅलीतून अपंग सैनिकांच्या कार्याला सलाम 

ऑनलाईन टीम / पुणे :

 देशांतर्गत देशाची सेवा करणाऱ्या पोलिसांनी  व्हिलचेअरवरील अपंग सैनिकांना मैत्रीचा हात देत रॅलीमध्ये सहभाग घेतला. आणि चिमुकल्यांनी गुलाबपुष्प देत देशाच्या भविष्यासाठी प्राणाची बाजी लावणाºया सैनिकांच्या कार्याला केलेला सलाम अशा देशभक्तीच्या प्रेरणेने भारलेल्या वातावरणात सद्भावना रॅली उत्साहात पार पडली. शहराच्या पूर्वभागामध्ये हिंदू-मुस्लिम गणेशभक्तांनी एकत्र येत अपंग सैनिकांसमवेत सद्भावना  रॅली काढून ऐन गणेशोत्सवात एकतेचा संदेश दिला.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि खडक पोलीस स्टेशनतर्फे मॉं तुझे सलाम ही सर्वधर्मिय सद्भावना रॅली काढण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, अ‍ॅड.शिरीष शिंदे, विद्या म्हात्रे, डॉ.मिलींद भोई, मुस्ताफभाई पटेल, नगरसेविका विजयलक्ष्मी हरीहर, मंडळाचे शिरीष मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर, वैभव पवार, पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पडोळे, मंडळाचे अध्यक्ष सचिण चव्हाण, अमर लांडे, सचिन ससाणे, अमेय थोपटे, विक्रांत मोहिते, बाळासाहेब झगडे, प्रशांत जाधव, अजिंक्य घुले, प्रदीप महाले, सागर केकान, संदीप ढगे, इब्राम्ह नदाब, अनिकेत बाबर आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, उपरणे, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अपंग पुर्नवसन केंद्र खडकी येथील प्रमोद सपकाळ, रमेश गाढवे, टि.के.रॉय, सुरेंद्र घुले या सैनिकांचा सन्मान करण्यात आला. गुरुवार पेठेतील जिव्हेश्वर हॉल पासून सुरु झालेल्या रॅलीचा समारोप शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ उत्सव मंडपात झाला. तिरंगी झेंडे, फुलांची उधळण आणि चौका-चौकात महिलांनी औक्षण केले. यावेळी अपंग कलाकार जावेद चौधरी यांना कृत्रिम पाय बसविण्याकरीता मंडळातर्फे १६ हजार रुपयांची मदत देण्यात आली.   
 राजेंद्र मोकाशी म्हणाले, गुरूवार पेठेत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात, या सामाजिक भावनेतूच अनेक कार्यकर्ते घडत आहेत. देशसेवा करीत असताना अपंगत्व आलेल्या या सैनिकांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत समाज तुमच्या बरोबर आहे, हे सांगणारा सद्भावना रॅलीचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. देशसेवेसाठी त्यांनी केलेले हे बलिदान सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. डॉ. मिलींद भोई म्हणाले, सैनिक काय आहेत, त्यांनी नक्की काय कार्य केले हे आजच्या तरुण पिढीसमोर आले पाहिजे. चित्रपटातील हिरोपेक्षा देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारे हे सैनिक तरुण पिढाचे आदर्श झाले पाहिजे. त्याकरीता शासनाने पाठ्यपुस्तकात सैनिकांच्या शौर्यगाथेचा एकतरी धडा असायला हवा, असे ही त्यांनी सांगितले. न्यू सुयोग म्युझिकल बँड मिरवणुकीत सहभागी झाला होता.