|Monday, December 10, 2018
You are here: Home » मनोरंजन » गाण्यातून उलगडणार बाप्पाच्या निर्मितीचा प्रवास

गाण्यातून उलगडणार बाप्पाच्या निर्मितीचा प्रवास 

मातीच्या गोळय़ापासून टप्प्याटप्प्यानं त्याला येणारा आकार… रंगरंगोटीतून साकारणारं श्री गणेशाचं रूप… साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा आणि आरती… हा श्री गणेशाचा प्रवास मोरया गणाधीशा या गाण्यातून प्रेक्षकांपुढे आला आहे. उडान टप्पू या आगामी चित्रपटातलं हे गाणं गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आलं.

गायत्री व्हिजन आणि जनप्रिया फिल्म्सच्या दत्ता मस्के टप्पू या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ऋषिकेश जोशी या चित्रपटाद्वारे आपला दिग्दर्शकीय प्रवास सुरू करत आहेत. मोरया गणाधीशा… हे गीत समफद्धी पांडे यांनी लिहिलं असून, सत्यजित लिमये यांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे. मिलिंद गुणे यांनी संगीत संयोजन केलं आहे तर ज्येष्ठ गायक पं. रघुनंदन पणशीकर यांनी हे गीत गायलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषिकेश जोशी म्हणाले, आपल्याकडे मुलांसाठी असे चित्रपट कमी तयार होतात. त्यामुळे मुलांना डोळय़ासमोर ठेवून हा चित्रपट करत आहे. पूर्वी गणेशाची मूर्ती घरोघरी तयार व्हायची. मात्र, आता तशी होत नाही. त्यामुळे मुलांना मूर्ती कशी तयार होते हेच माहीत नाही. हे लक्षात घेऊन हे गाणं तयार झालं. मुलांना हे गाणं आवडेलच, शिवाय मोठय़ांनाही जुन्या काळात घेऊन जाईल. या गाण्यातून मूर्ती घडण्याचा प्रवास मांडला आहे. तसंच गणेश मूर्ती घडवण्याच्या प्रक्रियेत वडील मुलांतलं नातं, मूर्ती घडवण्यातील मुलांची आत्मीयताही पहायला मिळते. नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण होणार असून, मार्च- एप्रिलमध्ये सुट्टीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Related posts: