|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शहरातील उमेदवारांना आले अच्छे दिन…

शहरातील उमेदवारांना आले अच्छे दिन… 

उद्योग-व्यवसातील अस्थिरता बऱयाच प्रमाणात कमी होऊन आर्थिक-औद्योगिक क्षेत्रातील नैराश्याचे वातावरण कमी होऊन उद्योग-व्यवसायात रोजगारपूरक वातावरण निर्माण होऊ लागले आहे व त्याचे दृश्य परिणामपण दिसू लागले आहेत. रोजगार  निर्मितीचे हे प्रमाण, संख्या आणि स्वरूप अनेकविध संदर्भात चर्चेचा मुद्दा बनतो आहे. अशा प्रकारची चर्चा होण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षात सुरू असणाऱया विविध विकास कामांतर्गत, विविध प्रकल्पाद्वारे जी कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत त्यामध्ये विविध स्तरांवर व विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध झाले आहेत, उपलब्ध होत आहेत. अशाप्रकारे निर्माण होणाऱया नोकऱया-रोजगार या संघटित-असंघटित क्षेत्रात व तसेच अल्पकालीन-कायमस्वरूपी उपलब्ध होत असल्याने त्यासंदर्भात निश्चित अशी आकडेवारी उपलब्ध होणे सहजशक्मय नाही.

या जनसामान्यांच्या व विशेषतः शिक्षित-प्रशिक्षित युवावर्गाच्या संदर्भात जिव्हाळय़ाच्या विषयावर सत्तारूढ व विरोधी पक्षांमध्ये वेळोवेळी चर्चा होणे अपरिहार्य आहे. या चर्चेच्या राजकीय प्रश्नोत्तरांमध्ये देशांतर्गत नव्याने उपलब्ध झालेल्या रोजगार संधींच्या आकडेवारीवर व त्याच्या तपशीलावर भर दिला जातो व याच संदर्भात उपलब्ध माहिती व रोजगार संधींच्या नव्या वस्तुस्थितीला अधिकृत स्वरूप देण्यासाठी एक वस्तुनि÷ व व्यावहारिक तोडगा म्हणून सरकारने विशेषतः केंद्र सरकारच्या स्तरावर देशात सुरू असणाऱया व विशेषतः सुरू होणारे नवे प्रकल्प, बांधकाम क्षेत्र, रस्ते निर्माण, वाहतूक, पर्यटन, उत्पादन, आर्थिक सेवा, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप, स्वयंरोजगार, कुटिरोद्योग, रिटेल इ. विविध ठिकाणी नव्याने उपलब्ध होणाऱया रोजगारसंधींची नेमकी व अधिकृत पुष्टी करण्यासाठी नव्याने उपलब्ध झालेल्या रोजगारापोटी कायदेशीर तरतूद व वैधानिकदृष्टय़ा आवश्यक तरतूद म्हणून व्यवस्थापन वा कंपन्यांना नव्याने रूजू होणाऱया कर्मचाऱयांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी वा कर्मचारी विमा योजनेंतर्गत दाखल होणाऱयांची संख्या व आकडेवारीची मोजमाप केल्याने रोजगारांची अधिकृत मोजमाप करण्याला व त्याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे.

दरम्यान उद्योग-व्यवसाय वाढीद्वारा रोजगार संधींमधील वाढ आणि वस्तुस्थिती यावर शासकीय-राजकीय स्वरूपाची चर्चा अद्यापि सुरू असतानाच विभिन्न व्यवस्थापन-कंपन्या या नव्याने उमेदवार व कर्मचाऱयांची निवड करताना मध्यम व छोटय़ा स्तरावरील शहरांमधील उमेदवारांची निवड करण्यावर योजनाबद्ध व विशेषत्वाने प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याचे अधिकृतपणे आता स्पष्ट झाले आहे. कंपनी-व्यवस्थापनांनी नव्याने उमेदवार-कर्मचाऱयांची निवड करताना हे जे धोरणात्मक व व्यवहारी परिवर्तन केले आहे त्यामुळे दोन बाबी प्रामुख्याने स्पष्ट झाल्या आहेत. एक म्हणजे नव्याने रोजगार संधींमध्ये होणारी वाढ आता लक्षणीय स्वरूपात होत असून रोजगारसंधीचे नवे व वाढते फायदे आता पूर्वीप्रमाणे मोठय़ा व महानगरांपर्यंतच मर्यादित न राहता या रोजगार संधी आता इतर शहरांमधील उमेदवारांना वाढत्या प्रमाण आणि संख्येत उपलब्ध होत आहेत.

गेल्या दशकात मेट्रो-महानगरात शिकलेल्या वा वास्तव्यास असणाऱया उमेदवारांना नोकरी-निवडीसाठी सहजपणे प्राधान्य देण्यावर कंपनी-व्यवस्थापन-व्यवस्थापकांचा भर असे, पण आता स्थिती मोठय़ा प्रमाणात बदलली असून मध्यम व लहान शहरातील विद्यार्थी-उमेदवारांचा आवर्जून विचार केला जात असे. उमेदवार निवड प्रक्रियेत झालेला बदल अनेकार्थांनी लक्षणीय ठरला आहे.

वेगवेगळय़ा स्तरावर उमेदवार-कर्मचाऱयांची निवड करताना कंपनी-व्यवस्थापनासाठी मोठय़ा प्रमाणात व प्रस्थापित स्वरूपात  काम करणाऱया बीटीआय एक्झिक्मयुटिव्ह सर्च कंपनी आतापर्यंत देशातील 14 शहरांमधील 43 कार्यालयाद्वारा आपला व्यवसाय कारभार चालवीत असे. यापैकी अधिकांश कार्यालये मेट्रो-महानगरे व राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये होती मात्र गेल्या काही महिन्यात आपल्या धोरणात्मक निर्णयाद्वारे गुवाहाटीमध्ये पूर्वोत्तर क्षेत्रातील उमेदवारांसाठी आपले कार्यालय थाटले. आपल्या याच प्रयत्नांच्या पुढल्या टप्प्यात बीटीआय एझिक्मयुटिव्ह सर्च कंपनीने आता आग्रा, बडोदा, लखनऊ, नागपूर, इंदूर व कानपूर या शहरामध्ये आपला कार्यविस्तार केला. यावरून कर्मचारी निवडीच्या संदर्भातील बदलत्या स्थिती-परिस्थितीचा अंदाज सहजपणे येतो.

       टोनी गुडविन म्हणतात…..

अँटेन इंटरनॅशनल या करिअर मार्गदर्शन व कर्मचारी निवड-मार्गदर्शन कंपनीचे संस्थापक-मुख्याधिकारी टोनी गुडविन यांच्यानुसार व्यवस्थापन आणि उमेदवार या उभयतांच्या नोकरी-रोजगारविषयक मानसिकतेत गेल्या काही वर्षात मोठे परिवर्तन घडून आले आहे. या बदलत्या परिस्थितीत आज शिक्षित-प्रशिक्षित उमेदवारांचे आपले करिअर सुरू करताना मेट्रो-महानगरांचे आकर्षण पूर्वीप्रमाणे राहिलेले नाही. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे महानगरांची सर्वदूर होणारी वाढ, वाढते बकालपण, कामासाठी करावा लागणारा त्रासदायक प्रवास, घर व राहण्याच्या वाढत्या अडचणी या समस्यापण कारणीभूत ठरल्या आहेत. त्यामुळेच विशेषतः सुशिक्षित उमेदवार आज आपले करिअर सुरू करताना अथवा नोकरी-रोजगारासाठी मध्यम व छोटय़ा शहरांचाच प्रामुख्याने विचार करू लागल्याने त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

      अच्छे दिनला सुरुवात

स्थानिक स्तरावर उमेदवारांना मोठय़ा प्रमाणात नोकरी-रोजगार देणारे प्रमुख उद्योग म्हणून सध्या रिटेल, वाहतूक-पर्यटन, माल वाहतूक, मूलभूत सुविधा-बांधकाम, संगणक सेवा, गुंतवणूक सल्ला-सेवा, कृषी व्यवसाय इ. व्यवसाय-उद्योगांचा समावेश आहे. या उद्योग-व्यवसायांचा व्याप आता मोठय़ा शहरांपासून मध्यम व लहान शहरांकडे वाढत्या प्रमाणावर होत आहे. या नव्याने विकसित होणाऱया व वाढत्या उद्योगांना नव्या कौशल्यासह काम करू शकणाऱया उमेदवारांची वाढती व कायमस्वरूपी गरज असल्याने नव्याने रोजगारासाठी येणाऱयांना मध्यम व लहान शहरांमध्ये मोठय़ा रोजगार-संधी मिळू लागल्या आहेत हे या संदर्भात महत्त्वाचे आहे. याशिवाय प्रस्थापित व जुन्या कंपन्या-उद्योग आपला कार्यविस्तार करण्यासाठी प्राधान्याने मध्यम व लहान शहरांचा वा उद्योग, वितरण व्यवस्था, आर्थिक सेवा, कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग, स्टार्टअप, महिला प्रधान व्यवसाय इ. ना गेल्या काही वर्षात जी चालना मिळत आहे त्यामुळे पण निमशहरी वा मध्यम शहरातील नोकरी-रोजगार संधींना गती मिळत आहे. परिणामी या मंडळींना चांगले दिवस येत असून त्यांचे ‘चांगभलं’ पण होऊ लागले आहे.

दत्तात्रय आंबुलकर