|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भुलला श्रीकृष्ण त्यांच्या भावा

भुलला श्रीकृष्ण त्यांच्या भावा 

गोपींची अवस्था पाहून भगवंताला दया आली आणि ते प्रकट झाले. नामदेवराय वर्णन करतात –

देतसे दर्शन । सकळांसी नारायण ।।  झाला सकळा आनंद । हृदयीं धरिला गोविंद ।। टाकोनियां आम्हां । कां गेलासी पुरुषोत्तमा ।। तुम्हां झाला अभिमान ।नामा म्हणे सांगे खूण ।।भगवान प्रकट झाले व त्यांनी सर्वांना दर्शन दिले. त्या सर्वांना खूप आनंद झाला. त्यांनी कृष्णाला कडकडून मिठी मारली. नंतर गोपींनी कृष्णाला विचारले-तू आम्हाला सोडून का गेला होतास? त्यावर श्रीकृष्ण गोपींना म्हणतात-सख्यांनो! तुम्ही सगळय़ा माझ्याच आहात. परंतु तुम्हाला अभिमान झाला होता. हा अभिमान नाहीसा करून तुमचे मन माझ्यात केंद्रित करण्याच्या हेतूनेच तुम्हाला विरहाग्नीत जाळावे लागले. (भगवंताला अभिमान अजिबात सहन होत नाही. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात –

नसंपडे इंद्रचंद्रब्रह्मादिकां ।अभिमानें एका तिळमात्रें।।

तिळमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ।।  भगवान गोपींना पुढे म्हणतात-माझ्याविषयी कुभाव ठेवू नका. देवांचे आयुष्य घेऊनही तुमची सेवा केली तरी तुमच्या प्रेमाचे ऋण फिटणार नाही. आता मी तुम्हाला सोडून कोठेच जाणार नाही. मी तर तुमचा जन्मजन्मांतरीचा ऋणी आहे. मी तुमच्या सर्वांच्या ऋणातून कधीच ऋणमुक्त होऊ शकणार नाही.  माझ्या सख्यांनो! तुम्ही माझ्यासाठी घरादाराच्या त्या साखळय़ा तोडून टाकल्या आहेत की ज्या योगीजन सुद्धा सहज तोडू शकत नाहीत. आमचे हे मीलन सर्वथा निर्मल आणि निर्दोष आहे. जरी मी अमर जीवन जगून आणि अक्षरदेहाने अनंत कालपर्यंत प्रयत्न केला तरी तुमची सेवा, प्रेम, त्याग यांचे ऋण फेडू म्हणून फिटणार नाही. भगवंत रामावतारात मारुतीचे ऋणी राहिले आणि कृष्णावतारात गोपींचे. त्यांच्याजवळ काहीच मागितले नाही तर ते ऋणी होतील. प्रल्हादाचे ते ऋणी झाले. बळीचे ऋणी होऊन द्वारपाल बनले. आपल्या संतांनीही देवाला ऋणी करून ठेवले. तुकाराम महाराजांचा अभंग सुप्रसिद्ध आहे -सर्वात्मकपण । माझेंहिरोनि नेतो कोण ।। मनीं भक्तीची आवडी । हेवा व्हावी ऐशी जोडी ।।घेईन जन्मांतरें। हेंचि करावया खरें ।। तुका म्हणे देवा । ऋणी करूनि ठेवू सेवा ।।भगवान भक्ती, प्रेम, सेवेने भक्तांचे ऋणी होतात. निरपेक्ष सेवेने देवालाही कायमचे  ऋणी करून ठेवता येते. प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांनी मग महारास केला. नामदेवराय वर्णन करतात -सकळांची इच्छा करीतसे पूर्ण । भुलला श्रीकृष्ण त्यांच्या भावा ।। विमानीं बैसोनी सुरवर पाहाती । गंधर्व गाताती सप्तस्वरें ।। विणे वाजताती मृदंगाचे घोश । वाचे तो उल्हास वर्णवेना ।। न जाय चंद्रमा न जाती नक्षत्रें । पाहाती सर्वत्र रासक्रीडा ।। जलक्रीडा करी लक्षुमीचा पती । लाळ घोटीताती देवस्त्रिया ।। धन्य त्या गोपिका धन्य त्यांचें पुण्य । भोगिताती कृष्ण पूर्णब्रह्म ।। नामा ह्मणे होय कामाची ते पूर्ती । नव्हे वीर्यच्युती गोविंदाची ।।

Ad. देवदत्त परुळेकर