|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » दिशा स्वच्छतेच्या

दिशा स्वच्छतेच्या 

मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा ज्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले त्यामध्ये ‘स्वच्छता’ हा विषय होता. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ म्हणणारा आणि पुस्तक प्रकाशन करताना हाती आलेले कागद जाकिटात ठेवणारा पंतप्रधान म्हणून मोदींचे कौतुक होऊ लागले. अनेक लोक थोडय़ाफार फरकाने झाडू चालवू लागले. रेल्वे, एस. टी. गाडय़ा, सरकारी कार्यालये स्वच्छ दिसू लागली. कचरा उठाव होऊ लागला. देशाच्या प्रधान स्थानी विराजमान व्यक्ती स्वच्छता आणि सदाचार हा विचार घेऊन पाऊले टाकते, स्वच्छतेचा आग्रह धरते तेव्हा परिवर्तनाला सुरूवात होते. समाजावर सुसंस्कार सुरू होतात. शाळेच्या क्रीडांगणावर कचरा टाकायचा नाही. चॉकलेटचे रॅपर कचराकुंडीतच टाकायचे हे संस्कार आणि जेवणापूर्वी हात धुवा अशा सवई बालवयात जडल्या. तर हळूहळू परिवर्तन होऊ लागते पण, त्यासाठी सततचा आग्रह, त्यासाठीची मोहीम, जागृतता आणि चांगले काम करणाऱयांच्या पाठीवर शाबासकी गरजेची असते. नरेंद्र मोदी यांनी स्वतःला प्रधानसेवक असे संबोधून या कामाला प्रारंभ केला आहे. त्यांचे स्वागत केले पाहिजे. सामाजिक सुधारणा या कायद्याने, शिक्षेने वा फतव्याने एका रात्रीत होत नसतात. त्यासाठी सातत्याने प्रयत्न व जागर गरजेचा असतो. मोदी सरकारने गेली चार वर्षे या कामात जी पावले टाकली आहेत ती अशी जागृती साधणारी आहेत.गेल्या 15 सप्टेंबरला भारत सरकारने स्वच्छता अभियान पार्ट 2 चा प्रारंभ केला. हे अभियान गांधीजयंतीपर्यंत सुरू राहणार आहे. यंदा म. गांधी यांचे 150 वे जयंती वर्ष सुरू होते आहे. हा योग साधून सरकारने स्वच्छता या कळीच्या विषयाला पुन्हा नव्याने हात घातला आहे. या अभियानाला सरकारने ‘स्वच्छता ही सेवा’ असे नाव दिले असून यात शाळा, महाविद्यालये त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी, सामाजिक संस्था यांना सहभागी केले जाणार आहे. नागरिकांना, ग्रामस्थांना आणि पंचायतींना श्रमदानातून स्वच्छतेचे संस्कार करायला सांगण्यात आले आहे. ‘चलो झाडू लगाएंगे’ अशी घोषणा देण्यात आली आहे. आपल्या संस्कृतीतही गणपती, दसरा, दिवाळी हे स्वच्छतेचे, साफसफाईचे व रंगरंगोटीचे दिवस मानले गेले आहेत. याच काळात वाकळ यात्रा होतात व ग्रामस्थ नदीवर जाऊन घरातल्या सतरंज्या,चादरी,मोठे कपडे धुतात. हाच विचार देशपातळीवर सरकार करते आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. गेली काही वर्षे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे साधक हातात झाडू घेऊन रस्ते स्वच्छ करताना, नाले साफ करताना व सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करताना दिसत आहेत. अलीकडे साधक हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरला जातो. पण, धर्माधिकारी प्रतिष्ठानची ही सेवा कुणालाही नजरेआड करता येणार नाही. आषाढी वारी निर्मलवारी व्हावी यासाठीही काही समाजसेवक कार्यरत आहेत. एकेकाळची रेल्वे, एस. टी. स्थानके व आजची रेल्वे व स्थानके डोळय़ासमोर आणली तरी बदल जाणवतो. सरकारी कार्यालये, दवाखाने, क्रीडांगणे, शाळा, खाऊ गल्ल्या इकडेही बदल दिसत असले तरी खूप व सातत्यपूर्ण काम करावे लागणार आहे. श्यामची आई या सानेगुरूजींच्या पुस्तकात छोटा शाम आंघोळ करून दगडावरून उतरताना आईला विचारतो ‘आई, पाय कुठे ठेऊ, माझ्या पायांना धुळ लागेल,डाग पडेल’, त्याची आई पदर पसरते व सांगते या पदरावर पाय ठेऊन घरी ये पण, लक्षात ठेव जसा पायाला डाग पडता कामा नये तसा मनाला,विचाराला, जीवनाला डाग असता कामा नये,’ श्यामच्या आईचे हे सांगणे स्वच्छता मोहिमेचे महन्मंगल स्तोत्र म्हटले पाहिजे. धर्माधिकारी प्रतिष्ठानचे साधक स्वच्छता करतात म्हणून आम्ही किती दिवस टाळय़ा वाजवणार. आम्हीही स्वच्छता केली पाहिजे आणि राखली पाहिजे. मनाची स्वच्छता हा सर्वोच्च विचार झाला पण, तनाची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, आचाराची स्वच्छता, विचारांची स्वच्छता असे अनेक बारकावे या मोहिमेशी जोडता येतील. आज घरोघरी शौचालये व स्वच्छतागृहे होत आहेत. तरीही रोगराई संपलेली नाही. माणसांचे अनेक व्यवहार उघडय़ावर सुरू असतात. मोठमोठय़ा शहरात रात्री दुकानदार दुकानात मुक्कामाला असतात. रात्री, पहाटे ते लघुशंकेला उठतात तेव्हा शेजाऱयाच्या दुकानासमोर घाण करतात. शेजारी उठतो तेव्हा तो यांच्या दुकानासमोर घाण करतो. आपण अंगण झाडतो व रस्त्यावर कचरा टाकतो, हे थांबले पाहिजे. कचरा गोळा करणे, वर्गीकरण करणे हा मोठा उद्योग आहे. कचऱयातून खत निर्मिती, गॅस निर्मिती असे अनेक विषय आहेत. त्या दिशेने पावले टाकली पाहिजेत. निदान ‘एक पाऊल पुढे टाका,कचरा कुंडीतच टाका’ इतके तरी आपण केले पाहिजे. मोठय़ा शहरात प्रचंड लोकसंख्येने आणि ग्रामीण भागात पुरेसे ज्ञान नसल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य असते. डोक्यात उवा, खरूज, अंगावर जखमा, जटा, नखे वाढलेली, दातांची स्वच्छता, केसाची निगा, शरीराची स्वच्छता, पोटाची स्वच्छता असे अनेक बारकावे आहेत. वयात येणाऱया मुला मुलींसाठीही स्वच्छतेचे धडे गरजेचे आहेत. या सर्व पातळीवर काम करणे वाटते तितके सोपे नाही आणि विचार केला तर अवघडही नाही. ही मोहीम सरकारी राहता कामा नये. ती लोकचळवळ झाली तर झटक्यात यशस्वी होईल. दिवाळीला आपण अभ्यंग्यस्नान करतो, दसऱयाला घरदार स्वच्छ करतो, रंगवतो, नवरात्रीत भांडी-कुंडी डबे, स्वयंपाक घर साफ करतो हाच विचार वर्षभर केला पाहिजे. आणि स्वच्छ हात, स्वच्छ मन, स्वच्छ आचार आणि स्वच्छ भारत यासाठी पावले टाकली पाहिजेत. पाण्याचे उद्भव, नद्या पवित्र ठेवल्या पाहिजेत त्यासाठी प्रत्येकाने स्वतःत बदल केले पाहिजेत. गांधीजयंतीच्या 150 व्या समारंभात भारत आणि भारतीय या दिशेने मोठे पाऊल उचलतील अशी आशा. यासाठी सर्व तऱहेच्या स्वच्छतेसाठी शुभेच्छा.