|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सगळे गोरगरीब माझे बांधव

सगळे गोरगरीब माझे बांधव 

जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हणतात. तुम्हा आम्हा सामान्य माणसांना साध्या डोळय़ांनी किंवा चष्मा लावून देखील जे दिसत नाही ते म्हणे कवींना दिसते. उदाहरणार्थ पावसाळय़ाची चाहूल लागली की आपल्या डोळय़ांना पावसाळी चपला, छत्र्या, रेनकोट, तुंबलेली गटारे, बंद पडलेल्या बसेस-लोकल्स आणि ट्राफिक जाम दिसतात. कवी लोकांना हिरवेगार गालीचे ल्यालेली वसुंधरा आणि तिची वर्णने करणारी यमके वगैरे दिसतात.

पण कधी कधी उलट देखील घडतं. म्हणजे पुढं काय घडू शकेल हे कवीला दिसत नाही. आपले लाडके कवी बा. भ. बोरकरांची एक अतिशय सुंदर कविता परवा आठवली. तिची एकच ओळ सांगतो.

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे

ही कविता आठवायला कारण झाली ती एक मोठ्ठी महत्त्वाची बातमी. कोणा एका काव्यप्रेमी मंत्री महोदयांना विचारलं की सध्या होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीवर तुमचं काय मत आहे? त्यावर ते म्हणाले की पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱया किमतींमुळे मला काही फरक पडत नाहीये, कारण मी एक मंत्री आहे, त्यामुळे मला मोफत पेट्रोल-डिझेल मिळतं. मात्र या विधानाला तत्काळ सावरून घेत ते पुढे म्हणाले, माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसेल,  पण इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे जनता मेटाकुटीला आली आहे हे मला समजतंय, दर कमी व्हायला हवेत.

मंत्री आणि मोठे पुढारी वगळता इतरांना सगळय़ाच गोष्टी महाग मिळत असतात. किती लोकांना हे समजतं, कुणास ठाऊक. काही वर्षांपूर्वी एका मंत्री महोदयांना लक्षात आलं होतं की आपल्याला टेलिफोन मोफत मिळत असले तरी जनतेला महाग मिळतात. सगळय़ा जनतेला मोफत टेलिफोन सेवा देणं शक्मय नसल्याने त्यांनी आपल्या खात्यातील सर्वांना ती देण्याचा घाट घातला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही.

या सगळय़ा गदारोळात आम्हाला लहानपणी पाठ्यपुस्तकात वाचलेला गांधीजींच्या जीवनातला प्रसंग आठवला. गांधीजी फक्त पंचा वापरीत. श्रीमंत घरातल्या एका छोटय़ा मुलीने गांधीजींना भेट देण्यासाठी सदरा आणला. तेव्हा गांधीजी म्हणाले, माझ्या सगळय़ा भावांना सदरा परवडत नाही तोवर मी हा सदरा घेऊ शकत नाही. मुलगी म्हणाली, कुठे आणि किती आहेत तुमचे भाऊ? त्यावर गांधीजी उत्तरले, अन्न-वस्त्र-निवाऱयाला मोताद झालेले देशातले सगळे गोरगरीब माझे बांधव आहेत.

असो.