|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पोलिसांनी थांबविली विसर्जन मिरवणूक

पोलिसांनी थांबविली विसर्जन मिरवणूक 

पोलिसांच्या भूमिकेवर काँग्रेस आक्रमक : गतवर्षीही पोलिसांबरोबर झाला होता वाद

प्रतिनिधी / मालवण:

राज्यभरात गौरीगणपती विसर्जन मिरवणुकांसाठी रात्री 12 पर्यंतची मुदत असताना मालवणात मात्र रात्री दहा वाजता पोलिसांनी जबरदस्तीने बेंजो बंद केल्याने गणेशभक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली. सोमवारी रात्री शहरातील प्रमुख नाक्यावर हा प्रकार घडल्याने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळू अंधारी यांनी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, मंगळवारी सकाळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांची भेट घेऊन पोलीसच विसर्जन मिरवणुकीत वाद निर्माण करीत असल्याचा आरोप केला. त्यावर चौधरी यांनी आपण चौकशी करतो, असे स्पष्ट केले.

काँग्रेसच्या शिष्टमंडळात माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष बाळू अंधारी, महेंद्र मांजरेकर, जीवन भोगावकर, संदेश कोयंडे आदी उपस्थित होते.

सर्वांना समान न्याय हवा!

मालवण बंदरजेटी तसेच अन्य परिसरात रात्री दहानंतरही बेंजो, डिजे वाजत होते. तेथे एकही पोलीस कर्मचारी कारवाईसाठी गेला नाही. मात्र, बाजारपेठेत कोणाचीही तक्रार नसताना गणेशभक्त नाचत बेंजोच्या साथीने गणेश मूर्ती विसर्जन करण्यास नेत असताना पोलीस तेथे आले व दहापर्यंत मुदत असल्याने बेंजो बंद करण्याचे फर्मान सोडू लागले. त्यांना विनंती करूनही त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. मोबाईलवरही शूटिंग सुरू असताना त्यावरूनही वाद घातला. डिजेला बंदी असताना पोलिसांच्याच आशीर्वादाने शहरात डिजे बिनधास्तपणे सुरू होते, त्याकडे दुर्लक्ष करून पोलीस यंत्रणा चुकीच्या पद्धतीने गणेशभक्तांना त्रास देत असल्याचा आरोप अंधारी यांनी केला. यावेळी पोलीस कर्मचाऱयासोबत झालेल्या वादाचे व्हीडिओ रेकॉर्डिंगही त्यांनी पोलीस निरीक्षकांसमोर सादर केले.

दक्षता समितीचे नुसते सोपस्कार

पोलीस यंत्रणेने आयोजित केलेल्या दक्षता समितीच्या बैठकीत भरड ते फोवकांडा पिंपळ हा रस्ता दुचाकीसाठी खुला करण्यास मान्यता देण्यात आली होती. गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत कायद्याचा बडगा उगारला जाणार नाही, असेही अधिकाऱयांनी सांगितले होते. मात्र, गणपतीच्या दोन दिवस अगोदरपासून भरड येथून दुचाकी वन-वेमध्ये नेल्यास कारवाई केली जात आहे. मिरवणुकीतही वेळेच्या बंधनाची सक्ती केली जात आहे. त्यामुळे दक्षता समितीची आवश्यकता काय? असाही सवाल अंधारी यांनी केला.

आमदारांनीही व्यक्त केली नाराजी

दरम्यान, आमदार वैभव नाईक हे पोलीस निरीक्षक यांच्याकडे चर्चेसाठी आले असता, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या मुद्यांवरून पोलिसांनी जबरदस्ती करू नये. फक्त मालवणातच वाद का होतात, असा सवाल केला. गतवर्षीही पोलीस निरीक्षकांनी वाद घातला. आता पोलीस कर्मचारी वाद निर्माण करीत आहेत. त्यामुळे यावर तातडीने निर्णय होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर उपस्थित होते.

पालकमंत्र्यांकडून दखल

अंधारी यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडेही तक्रार केली. पालकमंत्र्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून मालवणातील प्रकारावर लक्ष घालण्याचे निर्देश दिले. राज्यात गौरी-गणपती विसर्जनासाठी रात्री 12 पर्यंत मुदत दिलेली असताना सिंधुदुर्गात याबाबत कोणती कार्यवाही झाली, याची माहिती घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे, अशी माहिती अंधारी यांनी दिली.