|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अग्रपूजेचा मान गणपतीलाच का?

अग्रपूजेचा मान गणपतीलाच का? 

कोणत्याही शुभकार्याचा आरंभ गणेशाला वंदन करूनच करायचा अशी श्रद्धा आहे. पूर्वी मुलांच्या शिक्षणाची सुरुवात व्हायची तीही ‘श्रीगणेशानेच’  ग्रंथ असो वा पोथी, पहिले स्तवन गणेशाचेच आढळते. पत्र, यादी, टिप्पण लिहिताना गणेशाप्रती ‘श्री’ असे लिहिते जाते. कीर्तन, भारूड, भजन, ओवी, लावणी इतकेच नव्हे तर नमनाला सुरुवात होते तीच मुळी ‘पयलं नमन गणेश देवाला’ यानेच! वास्तविक पंचायतनातील इतर देवही विलक्षण सामर्थ्यवान, विष्णू, शिव, सूर्य, शक्ती, सारेच पराक्रमी परंतु या कुणालाही अग्रपूजेचा मान न मिळता गजमुख, एकदंत गणपतीलाच कसा मिळाला? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक गोष्टी समोर येतात.

कोणत्याही कार्यारंभी गणेशाची आराधना केलीच पाहिजे अशी परंपरा वेदकालापासूनच चालत आली आहे. एकटय़ा गणेशाचे पूजन म्हणजे पूर्ण पंचायतनाचे पूजन असे वर्णन गणेश पुराणात आढळते. गणेशाला अग्रपूजेचा मान कसा मिळाला हे पाहताना ‘गणेश जन्म’ नेमका कसा, गणपती नेमका आला कसा हेही उलगडत जाते. काही जाणकारांच्या मते ‘गणपती’ या शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम ‘ऋग्वेदात’ पहायला मिळतो. तिथे दुसऱया मंडलाच्या तेवीसाव्या सुक्तातील पहिल्या मंत्रात तो वापरला आहे. गणानां त्वा गणपतिं हवा महे । कविं कविनामुपमश्रवस्तम् ।ज्ये÷राजं ब्रह्मणस्पत आ नः । श्रुण्वन्नुतिभिः सीद सादनम् ।। आजही गणपती पूजनात हा मंत्र वापरला जातो. परंतु मंत्रातील ‘गणपती’ हा उल्लेख ब्रह्मणस्पतीचा आहे हे दुसऱया पंक्तीवरून सिद्ध होते. ब्रह्मस्पती म्हणजे ब्रह्माचा स्वामी. ‘ब्रह्मन’ याचा अर्थ प्रार्थना किंवा सूक्त, याचा अधि÷ाता. ‘सायणाचार्यांनी’ याचा स्वीकार करून म्हटले आहे की, ब्रह्म म्हणजे मंत्र, मंत्राचा स्वामी तो ब्रह्मणस्पती. ही उपाधी ‘बृहस्पतीसाठी’ वापरली जाते. बृहस्पती हा देवांच्या गणांचा अधिपती होता म्हणून त्याला ‘गणपती’ असेही संबोधले जाते. शिवाय तो बुद्धीचा अधि÷ाता होता म्हणूनच त्याला ब्रह्मस्पती हेही नाव दिले गेले.

‘शुक्ल यजुर्वेदातही’ गणपतीचा जो अनेकवेळा उल्लेख होतो तो बृहस्पतीचाच असून गणेशाचा नसल्याचे काही जाणकार म्हणतात, मग गणपती आला कुठून तर ‘विनायकातून!’ विनायक आले अनार्यांच्या देवांमधून ‘अथर्वशिरस उपनिषदात’. उपनिषदात ‘वैदिक रुद्रांचा संबंध अनेक अनार्य देवांशी होत गेला त्यात हे विनायक होते. महाभारतामध्ये ‘विनायकांचे’ विस्तृत वर्णन आढळते. ‘मानवगृहय़सूत्रात’ त्यांचे आणखी विवरण आढळते. विनायक चार असून शालकरंक, कुष्माण्डराजपुत्र, उस्मित व देवयर्जन अशी त्यांची नावे आहेत.
‘याज्ञवल्म्य स्मृती’मध्ये विनायकांबाबत शांती विधानाबरोबरच सूत्रांपेक्षा अधिक विवरण करण्यात आले आहे. रुद्र व ब्रह्मदेवाने विनायकाला गणांचा अधिपती बनवले, असे स्मृती सांगते. इथे चाराऐवजी एकाच विनायकाचा उल्लेख आहे. त्याच्या अधिपत्याखाली गणांनी काम करायचे ते मानवीकार्यात विघ्ने आणण्याचे म्हणून तेव्हाचे नाव विघ्नेश. परंतु गणांचा तो अधिपती म्हणून तेव्हाचा गणपती! विनायक एक आहे परंतु त्याची नावे सहा आहेत. मित्त, संमित, शाल, कंटक, कुष्मांड, राजपुत्र. शिवाय विनायकाला ‘अम्बिकेच्या’ रूपाने प्रथमच इथे माता मिळाली. अम्बिका ही पुढे शक्तीरूपात विलीन होऊन शिवपत्नी बनली त्यामुळे साहजिकच विनायक शिवपुत्र बनला.

नंतर विविध पुराणांमधून गणेशजन्माच्या अनेक कथा सांगितल्या आहेत. त्या सर्व कथांचे बीज ‘स्मृती’मध्ये पहायला मिळते. अशा रीतीने सूत्रकाळापासूनच स्मृतीकाळापर्यंत प्रवास करताना विनायकाचे एक रूप झाले आणि ‘गणपती विघ्नेश’ म्हणून त्याला निश्चित स्वरूप मिळाले. अंबिकेचा पुत्र म्हणून ‘विनायकाशी’ सांगड पडल्यानंतर वैदिक देवत्रयीतील शिवाचा तो मुलगा झाला आणि इतर देवतांमधून त्यांना देवपंचायतनामध्ये स्थान मिळाले. तो विनायकातून उत्क्रांत झाला असल्यामुळे विनायकांचे शांतीचे विधी त्याच्या नावे केले जाऊ लागले. कार्याच्या प्रारंभी विघ्नांचा नाश करण्यासाठी विनायकाची, गणपतीची पूजा करण्याचा प्रघात पडला. त्याची विघ्नेश, विघ्नेश्वर ही नावे बाजूला राहून तो विघ्नहर्ता, विघ्नांतक या नावाने ओळखला जाऊ लागला. प्रत्यक्ष मूर्तीरूप येण्यापूर्वी मूर्तीरूपास साहाय्यभूत ठरावे अशी त्याची वाङ्मयीन वर्णने पुराणादी वाङ्मयातून यायला सुरुवात झाली होती. यामध्ये अनेक कथा आढळतात.

अग्रपूजेच्या मानाबाबत पृथ्वी प्रदक्षिणेची एक कथा शिवपुराणात आढळते. गणपतीने आई-वडिलांना प्रदक्षिणा घालून आपणच अग्रपूजेचे मानकरी आहोत हे बुद्धीचातुर्याने सिद्ध केले. ती कथा सर्वज्ञात आहेच. असा हा प्रथमपूजेचा मानकरी ॐकार गणेश. तो गणांचा पती आहे. बुद्धीचा अधिपती आहे आणि म्हणूनच मंगलकार्य आदीप्रसंगी त्याचे प्रथम पूजन करतात. विद्यारंभे विवाहे च । प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव । विघ्नस्तस्य न जायते ।। विद्यांचा प्रारंभ, मंगलकार्ये, गृहप्रवेश यात्रा आणि आपत्तीचा काळ यावेळी जो विघ्नहर्त्या गणेशाचे स्मरण करील त्याची संकटे दूर होतील असा याचा अर्थ आहे.

थोडक्मयात गणेश विघ्नहर्ता आहे म्हणून निर्विघ्न परिसमाप्तीसाठी किंवा गणपती व ॐकार एकरूप मानले तर ज्याप्रमाणे ॐकार वेदपठणात सदैव प्रथम उच्चारला जातो, त्याप्रमाणेच गणपतीची पूजा प्रथम केली जाते, असा अग्रपूजेचा मान असलेल्या सर्वांच्या लाडक्मया ‘बाप्पाचे’ श्री गणेशाचे रूप हे ‘चर्मचक्षुगम्य’ व ‘प्रज्ञाचक्षुगम्य’ असे दुहेरी आहे. समोर दिसणाऱया व्यक्त रूपातील हत्तीची सोंड, मोठ्ठे कान, इवलेसे डोळे, अगडबंब पोट आणि चिमुकल्या उंदराचे आसन या गोष्टी जरी वेगळय़ा वाटत असल्या तरी त्याला गूढ आध्यात्मिक, सामाजिक अर्थ आहे.

एकंदरच गणराज्य पद्धती आणि त्याचा शासक, अध्यक्ष, कर्ता कसा असावा हे सुचविणारे ‘बाप्पांचे’ रूप आहे. राज्यसंस्थेची वरील पद्धत सांगणारे ब्रह्मणस्पती सूक्तातील ‘गणनां त्वा गणपतां’… हे वचन तेच सुचवते. गणपतीच्या माध्यमातून अनेक गोष्टी सूचित केल्या आहेत. गणपती अथर्वशीर्षात शरीरशास्त्राचासुद्धा अभ्यास आढळतो. इडा, पिंगला, सुषुम्ना नाडय़ांचा संभार म्हणजे गणेशाची शुंडा आणि उजवी विगूढा चेतनी हा दंत! श्रीगणेशाचे ध्यानासाठी घेतलेले हत्तीची सोंड व एकदंत हे रूप सामान्य माणसाच्या मनःचक्षुसमोर येण्यास या प्रतीकाच्या माध्यमातून सोपे जाते. मुख्य नाडी बंधांना व चक्रांना ‘मूलाधार चक्र’ स्वाधि÷ान चक्र मणिपूर वा नाभिकमल चक्र, (Cervical Plexus) आज्ञाचक्र  (Optic Plexus) आणि सहस्राकार चक्र यांना उद्दिपीत करण्यास एकाग्रता आणि नाद हे प्रमुख साधन आहे. म्हणून अथर्वशीर्षात ‘मुलाधार स्थितोसी नित्यम् नाद संधानम्, तन्नो दंति प्रचोदयात्’ असे उल्लेख आहेत. गणेशावर लक्ष केंद्रित करून चैतन्याचे उत्थान करणे सोपे जाते.

ध्याता आणि ध्यानाचा विषय हे दोन्हीही मावळले आणि कालातीत अस्मिता फक्त राहिली, म्हणजे चित्त आणि अहंकारमय स्मृती यांचे पाश तुटतात. साऱयाच विलक्षण गोष्टी देऊ शकण्याचे सामर्थ्य या गणेशात आहे. विघ्नहर्ता, बुद्धिदाता तर तो आहेच, परंतु नीट अभ्यास केला तर त्यातून सूचकताही निदर्शनास येते. आणि म्हणूनच इतकी गुणवैशिष्टय़े त्याच्या ठायी आहेत. त्याला अग्रपूजेचा मान असणे यात वावगे काहीच नाही.

Ad.  सुमेधा देसाई,