|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कणकवलीत दोन गटात हमरीतुमरी

कणकवलीत दोन गटात हमरीतुमरी 

दोन्ही गट राजकीय प्रतिस्पर्धी : एका कार्यकर्त्याच्या वाहनाला ‘फटका’

वार्ताहर / कणकवली:

कणकवली शहराच्या राजकारणातील प्रतिस्पर्धी असलेल्या दोन गटांमध्ये सोमवारी रात्री उशिरा बाचाबाची होत विषय हमरीतुमरीवर आला. महार्गालगत घडलेल्या या प्रकारात एका विद्यमान लोकप्रतिनिधीने आपल्या कार्यकर्त्याला हूल दिल्याच्या रागातून एका गटातील काहीजण ‘त्या’ लोकप्रतिनिधीला जाब विचारण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी त्या लोकप्रतिनिधीनेही आपली माणसे गोळा करण्यास सुरुवात केली. ही बाब जाब विचारण्यासाठी केलेल्या गटाच्या एका माजी पदाधिकाऱयाला समजल्यानंतर त्याने धाव घेत मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकला. या विषयाची चर्चा शहरात दिवसभर सुरू होती.

‘एकच लक्ष्य’ ठेवून शहरात काम केलेल्या गटाच्या एका लोकप्रतिनिधीने दुसऱया गटातील एका कार्यकर्त्याला हूल दिल्याच्या प्रकारातून हा वाद घडल्याचे समजते. दुसऱया गटातील त्या कार्यकर्त्याने ही बाब आपल्या गटाच्या मित्रांना सांगितली. नंतर याला राजकीय रंग चढू लागला. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी सोमवारी रात्री तो गट थेट त्या लोकप्रतिनिधीच्या दुकानाच्या दिशेने गेला. तेथे असलेल्या त्या लोकप्रतिनिधीला दुकानाबाहेर बोलावत खुन्नस देण्याचा प्रकार यावेळी सुरू झाला. त्या लोकप्रतिनिधीनेही जशास तसे उत्तर देत ही बाब आपल्या अन्य सहकाऱयांना कळविली. त्या लोकप्रतिनिधीसोबत असलेल्या एका सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱयाने जाब विचारण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या अंगावर जात तेथे उभ्या गाडीवर बॅटने हल्ला चढविला. मात्र ती गाडी आपल्याच कार्यकर्त्याची असल्याचे नंतर स्पष्ट झाले. या वादाचा मात्र त्या कार्यकर्त्याच्या गाडीला फटका बसला.

मध्यरात्रीनंतरच हा सारा प्रकार महामार्गालगत सुरू होता. दरम्यान ही बाब जाब विचारण्यासाठी गेलेल्या गटाच्या माजी पदाधिकाऱयाला समजताच त्याने तेथे धाव घेत दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शहरात हा प्रकार मध्यरात्रीच सगळीकडे पसरताच दोन्ही गटाचे कार्यकर्ते घटनास्थळी धाव घेऊ लागले. मात्र तोपर्यंत समझोत्याने या विषयावर पडदा टाकण्यात आला. या विषयाची मंगळवारी दिवसभर शहरात चर्चा सुरू होती.