|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » साडेतीन लाखाचे दागिने लंपास

साडेतीन लाखाचे दागिने लंपास 

वेर्ले येथे घरफोडी : राणे कुटुंबीय गणेश मूर्ती विसर्जनास गेले असता घटना

प्रतिनिधी / सावंतवाडी:

वेर्ले-राणेवाडी येथील वासुदेव सोमा राणे यांच्या घरी सोमवारी रात्री झालेल्या चोरीत सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या दागिन्यांसह चार हजार रुपये चोरटय़ांनी लंपास केले. राणे कुटुंबीय सोमवारी सायंकाळी पाच दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. ही संधी साधून चोरटय़ांनी मागील दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान, या प्रकरणी दोघा संशयितांची नावे देण्यात आली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत. या चोरीची तक्रार श्यामल वासुदेव राणे (21) यांनी पोलिसात दिली.

राणे व त्यांचे कुटुंबीय नोकरीनिमित्त मुंबईत राहतात. राणे यांचे सुपुत्र रितेश हे मुंबईत माहिमचे मनसे शाखप्रमुख आहेत. वासुदेव राणे पत्नीसह गणेश चतुर्थी सणासाठी गावी आले होते. सोमवारी पाचव्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी राणे कुटुंबीय घर बंद करून घरापासून पाचशे मीटर अंतर असलेल्या गणेश मूर्ती विसर्जनस्थळी गेले होते. ही संधी साधून चोरटय़ाने घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील बॅगेमध्ये ठेवलेले सोन्याचे कानातील झुपके, सोन्याचा नेकलेस व चार हजार रुपये असा सुमारे साडेतीन लाखाचा ऐवज लंपास केला. विसर्जनानंतर राणे कुटुंबीय घरी आल्यानंतर चोरीची घटना उघड झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव, अण्णासो बाबर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या चोरीमागे स्थानिकाचा हात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान, तक्रारदाराने दोघा संशयितांची नावे पोलिसांना दिली असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती तपासी अधिकारी जाधव यांनी दिली.

Related posts: